सावधान! दिल्लीची हवा तुमच्यासाठी धोकादायक आहे! 

पीटीआय
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

दम्याच्या विकारासाठी कारणीभूत असणाऱ्या सल्फर डायऑक्‍साईडचे प्रमाणही दिल्लीच्या हवेत प्रमाणापेक्षा खूपच जास्त आहे. दिल्लीच्या हवेत असलेल्या प्रदूषित घटकांशी सतत संपर्क आला, तर श्‍वासनलिकेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

नवी दिल्ली: आधीच प्रदूषित असलेल्या राजधानी दिल्लीची हवा दिवाळीतील तीन दिवसांनंतर अधिकच धोकादायक झाली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांतील ही दिल्लीच्या हवेची सर्वांत खराब स्थिती आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दिल्लीमध्ये 30 ऑक्‍टोबर रोजी 21 पट प्रदूषण झाले. 

मध्यरात्री अडीच वाजता दिल्लीतील आनंदविहार या भागात नोंदविलेल्या एका नोंदीनुसार, यावेळी येथील प्रदूषणाची पातळी प्रमाणापेक्षा तब्बल 14 पट अधिक होती. आर. के. पुरम आणि इतर गजबजलेल्या भागांमध्येही मध्यरात्रीच्या नोंदींनुसार साधारणत: अशीच परिस्थिती होती. दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच प्रचंड धूर करणाऱ्या फटाक्‍यांच्या आतषबाजीमुळे या प्रदुषणात अधिकच भर पडली. 

राजधानी दिल्लीत काल (सोमवार) सकाळी धूर आणि धुक्‍याचे साम्राज्य होते. सोमवारच्या हवेतील प्रदूषण गेल्या तीन वर्षांतील सर्वांत धोकादायक होते. दम्याच्या विकारासाठी कारणीभूत असणाऱ्या सल्फर डायऑक्‍साईडचे प्रमाणही दिल्लीच्या हवेत प्रमाणापेक्षा खूपच जास्त आहे. दिल्लीच्या हवेत असलेल्या प्रदूषित घटकांशी सतत संपर्क आला, तर श्‍वासनलिकेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

केंद्र सरकारने दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेतली आहे. 'खुल्या जागेत कचरा किंवा इतर वस्तू जाळण्यावर बंदी घाला' अशी नोटीस केंद्र सरकारने पंजाब, दिल्ली, हरियाना, राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारला बजावली आहे. 'दिल्ली आणि शेजारच्या भागात उघड्यावर घनकचरा जाळला जातो आणि हे प्रदूषणाचे एक मुख्य कारण आहे. तसेच, वाहनांमधून होणारे प्रदूषण, दिल्लीतील बांधकामे आणि शेजारील राज्यांमध्ये जाळला जाणारा शेतीतील कचरा ही इतर कारणे आहेत. त्यामुळे उघड्यावर घनकचरा जाळण्यावर बंदी घालण्यासाठी पाच राज्यांना नोटीस बजावण्यात आली आहे,' असे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे.

Web Title: Delhi pollution level at hazardous level; Center summons 5 states