Raid on Newsclick : दिल्लीमध्ये ‘न्यूजक्लिक’वर छापे; पत्रकारांच्या घरांची झडती

दिल्लीच्या विशेष शाखेने आज ‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळाच्या कार्यालयावर तसेच या संकेतस्थळाशी संबंधित पत्रकार आणि लेखकांच्या घरांवर छापे घातले.
Newsclick
Newsclicksakal

नवी दिल्ली - चीनच्या प्रचारासाठी आर्थिक पाठबळ मिळाल्याच्या आरोपावरून दिल्लीच्या विशेष शाखेने आज ‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळाच्या कार्यालयावर तसेच या संकेतस्थळाशी संबंधित पत्रकार आणि लेखकांच्या घरांवर छापे घातले. केंद्र सरकारच्या या कारवाईचा काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी तसेच पत्रकारांच्या संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला असल्याचे पत्रकार संघटनांनी म्हटले आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एक वृत्त प्रकाशित केले होते. यात चीनच्या प्रचारासाठी काही संघटनांना अमेरिकेतील नेविल रॉय सिंघम यांच्यामार्फत आर्थिक मदत मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. ही मदत मिळालेल्या संघटनांमध्ये ‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाचाही समावेश असल्याचे म्हटले होते. यानंतर ‘न्यूजक्लिक’वर विविध प्रकारचे आरोप होऊ लागले होते.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याआधीही या संकेतस्थळावर छापे घातले होते. दरम्यान या कारवाईबाबत केंद्रीय माहिती आणि नभोवाणीमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केल्याचे सांगताना त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.

तपासंस्थांची संयुक्त कारवाई

आज देशातील जवळपास ३५ ठिकाणी छापे घालण्यात आले यात सात पत्रकारांच्या घरांचाही समावेश आहे. ही कारवाई दिल्ली विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, व सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांनी संयुक्तपणे केली. ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांनी ही बातमी पहिल्यांदा ‘एक्स’वर दिली.

‘न्यूजक्लिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रबीर पुरकायस्थ, पत्रकार उर्मिलेश, पत्रकार व ‘एनडीटीव्ही’चे माजी व्यवस्थापकीय संपादक आनिंदो चक्रवर्ती, पत्रकार भाषा सिंग यांच्यावर घराचीही झडती घेण्यात आली.

सेटलवाड यांच्या घराची झाडाझडती

कॉमेडियन संजय राजौरा, लेखक सोहेल हाशमी यांच्या घरावरही छापे घालण्यात आले. मुंबईतील तिस्ता सेटलवाड यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्यांचे मोबाईल, लॅपटॉप चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांना लोधी कॉलनीतील विशेष शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले होते परंतु त्यांच्या अटकेला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com