रामलीला मैदानाचे होणार अटलबिहारी वाजपेयी नामकरण

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी 16 ऑगस्टला निधन झाले होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. वाजपेयींच्या निधानानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. विविध माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानाचे नामकरण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याच्या निर्णय आज (शनिवार) उत्तर दिल्ली महापालिकेकडून घेण्यात येण्याची शक्यता आहे.

वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी 16 ऑगस्टला निधन झाले होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. वाजपेयींच्या निधानानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. विविध माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. आता उत्तर दिल्ली महापालिकेकडून या महान नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

दिल्लीतील रामलीला मैदान हे ऐतिहासिक आहे. या मैदानावर अनेक राजकीय सभा, उपोषणे सुरु असतात. देशभर या मैदानाची ओळख आहे. वाजपेयींनी घेतलेल्या याठिकाणी सभेला प्रचंड गर्दी झाली होती. अनेकवेळा त्यांनी या मैदानाला भेट दिलेली आहे. त्यामुळे रामलीला मैदानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून देण्यात आला आहे. छत्तीसगड सरकारनेही छत्तीसगडची नवी राजधानी नया रायपूरचे नाव बदलून अटल नगर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Delhi Ramlila Maidan may be renamed to honour Atal Bihari Vajpayee