esakal | Delhi: शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार?
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना नेते खासदार राऊत

शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधींची उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली अटक यावरून शिवसेनेने कॉंग्रेसची पाठराखण करताना विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आवाहन केले आहे. या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कॉंग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेने लखीमपूर खेरी येथे शिष्टमंडळ पाठविण्याची तयारी केली असल्याचे समजते.

लखिमपूर खेरीच्या घटनेनंतर सर्व विरोधी पक्ष सत्ताधारी भाजप विरोधात विशेषत: उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. या घटनेत आठ जणांचा बळी गेल्यानंतर तेथे निघालेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधींना राज्य पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दुपारी राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर खासदार राऊत यांनी चर्चेचा तपशील देण्याचे टाळले. मात्र यामध्ये लखीमपूर खेरीचे प्रकरण, तसेच देश आणि राज्यातील राजकीय मुद्द्यांवर बोलणी झाल्याचे समजते.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

तत्पूर्वी संजय राऊत यांनी ट्विट करून राहुल गांधी यांची भेट होणार असल्याचे जाहीर करताना लखीमपूर खेरीची घटना देशाला हादरविणारी असल्याची टिप्पणी केली. प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश सरकारने अटक केली असून विरोधी पक्षांच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून अडविले जात आहे. उत्तर प्रदेशात सरकारच्या दडपशाहीविरुद्ध विरोधी पक्षांनी एकजूट होऊन पावले उचलण्याची गरज आहे, असे ट्विट राऊत यांनी केले.

loading image
go to top