भारत आणि इस्राईल आणखी जवळ येणार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

वर्तमान राजवटीने गतइतिहासाच्या काही खुणा पुसण्याचे प्रकार जाणीवपूर्वक सुरू केले आहेत व त्याच मालिकेत हा निर्णय करण्यात आला. औरंगजेब रस्त्याचे नामकरण आता ए. पी. जे. अब्दुल कलाम मार्ग करण्यात आले आहे आणि अशी अनेक बदलाबदली सुरू आहे. याच मालिकेत आता हे नवे नामकरण केले जात आहे.

नवी दिल्ली - राजधानीतील ऐतिहासिक तीन मूर्ती चौक आणि तीन मूर्ती मार्ग आता या पुढे "तीन मूर्ती हैफा चौक' आणि "तीन मूर्ती हैफा मार्ग' म्हणून ओळखला जाईल. याबाबतचा प्रस्ताव संस्कृती मंत्रालयाने नवी दिल्ली नगर परिषदेकडे दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी जुलै महिन्यातील इस्राईल भेटीच्या निमित्ताने तेथील ऐतिहासिक "हैफा' शहराचे नाव या चौकाला आणि मार्गाला देण्यात येणार आहे. 

तीन मूर्ती चौक आणि तीन मूर्ती मार्ग हे ऐतिहासिक तीन मूर्ती भवनाजवळ असल्याने या रस्त्यास व चौकास तीन मूर्ती नावाने ओळखले जाऊ लागले. साऊथ ऍव्हेन्यू, चाणक्‍यपुरीच्या मध्ये हा चौक आहे. खरे तर येथे मध्यभागी गोलाकार हिरवळ असून एकंदर सहा रस्ते या वर्तुळात मिळतात. कोपऱ्यावरच भव्य असे तीन मूर्ती भवन आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना तेथे निवास करीत आणि त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री आणि अल्पकाळ इंदिरा गांधी यांनी या भवनात निवास केलेला होता. इंदिरा गांधी यांनी या भवनाचे रूपांतर स्मृती संग्रहालयात केले. या भवनाच्या परिसरातच नेहरू मेमोरियल ग्रंथालय, सभागृह वगैरे आहे. 

वर्तमान राजवटीने गतइतिहासाच्या काही खुणा पुसण्याचे प्रकार जाणीवपूर्वक सुरू केले आहेत व त्याच मालिकेत हा निर्णय करण्यात आला. औरंगजेब रस्त्याचे नामकरण आता ए. पी. जे. अब्दुल कलाम मार्ग करण्यात आले आहे आणि अशी अनेक बदलाबदली सुरू आहे. याच मालिकेत आता हे नवे नामकरण केले जात आहे. 

पहिल्या महायुद्धात 1918 मध्ये ब्रिटिश आधिपत्याखालील भारतीय सैन्याच्या तीन तुकड्यांनी वर्तमान इस्राईलमधील हैफा हे शहर काबीज करण्यात शौर्य दाखविले होते. त्याची स्मृती आणि गौरव करण्यासाठी आणि भारतीय पंतप्रधानांच्या जुलै महिन्यातील भेटीच्या निमित्ताने हे नामकरण करण्यात येत आहे. 

Web Title: Delhi: Teen Murti Marg, Chowk renamed after Israel city Haifa