Rahul Gandhi : सरकार घाबरल्याने तमाशा; राहुल गांधी

राहुल गांधी : अदानी प्रकरण झाकण्याचा प्रयत्न
demand for apology from ruling party for statements made diversion Adani case politics rahul gandhi
demand for apology from ruling party for statements made diversion Adani case politics rahul gandhiesakal

नवी दिल्ली : परदेशातील विधानांवरून माफीनाम्याची सत्ताधाऱ्यांकडून होणारी मागणी हा अदानी प्रकरणावरून लक्ष अन्यत्र वळविण्याचा प्रकार आहे. सरकार आणि पंतप्रधान घाबरले आहेत. त्यामुळे हा तमाशा सुरू आहे, असा उलटवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. ‘आपण सरकारला संसदेत उत्तर देऊ. मात्र आपल्याला बोलू दिले जाईल, असे वाटत नाही,’ अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

इंग्लंड दौऱ्यात राहुल यांनी भारतीय संसदेचा अपमान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या माफीच्या मागणीवरून सत्ताधाऱ्यांनीही संसदेचे कामकाज रोखून धरल्याचे चित्र आहे. त्यापार्श्वभूमीवर परदेश दौऱ्यावरून परतलेल्या राहुल यांनी गुरुवारी या प्रकरणावर मौन सोडताना अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केले.

राहुल गुरुवारी संसदेत बोलतील, असे काँग्रेसकडून कालपासून सांगण्यात येत होते. अर्थात, लोकसभेत गोंधळामुळे अवघ्या काही मिनिटांतच कामकाज तहकूब झाले. त्यानंतर संसदेच्या आवारात राहुल यांना पत्रकारांनी माफिनाम्याच्या मुद्द्यावर विचारले. त्यावेळी ‘आपले म्हणणे सभागृहातच मांडू,‘असे राहुल यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दुपारी काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषद त्यांनी सरकारवर शरसंधान केले.

ते म्हणाले की, ‘लोकसभेत आपल्याला बोलण्याची परवागनी मिळावी, अशी मागणी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून केली. सरकारच्या चार मंत्र्यांनी आपल्यावर आरोप केले असल्याने त्यावर उत्तर देण्याचा आपला हक्क असल्याने बोलू द्यावे, असे सांगितले. परंतु, आपण गेल्यानंतर लगेच लोकसभा तहकूब झाली. आपल्याला सभागृहात बोलू द्यावे ही अपेक्षा आहे. परंतु बोलू दिले जाईल याची खात्री वाटत नाही.‘

लोकसभेत आपल्या भाषणातील मोदी-अदानी संबंधांबाबतचे जे मुद्दे वगळण्यात आले ते आधीपासूनच लोकांसमोर होते. सरकार आणि पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. त्यामुळे अदानी प्रकरणावरून दिशाभूल करण्यासाठी हा गोंधळ घातला जात आहे. मात्र, पंतप्रधान मोदी ज्या प्रश्नांचे उत्तर देऊ इच्छित नाहीत, ते प्रश्न कायम आहेत, अशा शब्दांत राहुल यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले.

माफी मागायलाच हवी : भाजपचा प्रतिहल्ला

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन राहुल यांच्यावर टीका केली. त्यांनी माफीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ‘१४० कोटी लोकांची किती दिवस दिशाभूल कराल,‘ असा सवाल त्यांनी केला. परदेशातील वादग्रस्त विधानांबाबत आजच्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी कुठेही खेद व्यक्त केला नाही. त्यांनी माफी मागायलाच हवी. भारतीय लोकशाहीचा आज कोणी अपमान केला असेल तर ते राहुल आहेत, अशी तोफही प्रसाद यांनी डागली. माफी मागितली जात नाही तोपर्यंत भाजपतर्फे देशभरात आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्याआधी गुरुवारी सकाळी कायदा मंत्री किरेन रिजिजू तसेच माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर या केंद्रीय मंत्र्यांनीही राहुल यांना लक्ष्य केले. देशहिताच्या मुद्द्यावर आपण गप्प बसणार नाही असे सांगून रिजिजू म्हणाले की, ‘राहुल किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी हवे ते बोलावे. परंतु देशाची बदनामी करण्याचा कोणालाही अधिकार नाही.‘ तर, जगभरात भारताचे नेतृत्व मान्य होत असताना ते मान्य करण्याची काँग्रेसची तयारी नाही, अशी खिल्ली ठाकूर यांनी उडविली.

राहुल यांची सारवासारव

पत्रकार परिषदेत राहुल यांना काही शब्द वापरल्यानंतर सारवासारव करावी लागली. भाजपच्या आरोपांना संसदेतच उत्तर देण्याची आपली इच्छा आहे. आपल्याला संसदेत बोलण्याची परवानगी मिळेल याची खात्री वाटत नाही, असे सांगताना राहुल म्हणाले की ‘त्यांच्या‘ दुर्दैवाने आपण खासदार आहोत आणि अपेक्षा आहे की संसदेत आपल्याला बोलू दिले जाईल. सर्वप्रथम संसदेत आपले म्हणणे मांडल्यानंतर माध्यमांशी तपशीलवार चर्चा केली जाईल. मात्र, "दुर्दैवाने आपण खासदार आहोत", या त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ लक्षात येताच शेजारी बसलेले माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राहुल यांना थांबविले आणि ही बाब त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल यांनी वेगळ्या प्रकारे सारवासारव केली. दुर्दैवाने माध्यमांच्या प्रश्नांची आज उत्तरे देता येणार नाहीत, असे सांगताना राहुल यांनी वेळ मारून नेली. परंतु, रमेश यांनी राहुलना केलेली सूचना रेकॉर्ड झाल्याने ती चित्रफीत व्हायरल झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com