लोकशाहीच्या आड स्थानिक वाद नकोत - सीताराम येचुरी

पीटीआय
शनिवार, 11 जानेवारी 2020

सरकारचे वागणे घटनाविरोधी - प्रियांका
वाराणसी - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट देत नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलकांची भेट घेतली. केंद्र सरकार राज्यघटनेच्या विरोधात वर्तणूक करत आहे, असा आरोप प्रियांका यांनी या वेळी केला. प्रियांका यांनी आज एका आंदोलक पती-पत्नींची भेट घेतली. आंदोलनानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. ‘हे दोघेही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते, तरीही त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी देशासाठी आवाज उठविण्यास मागेपुढे पाहिले नाही, याचा मला अभिमान आहे,’ असे प्रियांका पत्रकारांना म्हणाल्या.  

त्यांचे दु:ख निवडक लोकांसाठी - पात्रा
नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांनी आंदोलकांची भेट घेण्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. प्रियांका यांना निवडक लोकांबद्दलच वाटते. राजस्थानमधील कोटामध्ये शेकडो बालकांचा सरकारच्या निष्काळजीपणाने मृत्यू झाला, त्यांच्या मातांना त्या अजिबात भेटण्यास जात नाहीत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.

नवी दिल्ली - राज्यपातळीवरील वाद आणि विरोध हे लोकशाही बचावाच्या आड येता कामा नयेत, अशी टीका माकप नेते सीताराम येचुरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे. विरोधकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित केलेल्या बैठकीवर ममता यांनी बहिष्कार घातल्यानंतर येचुरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १३ जानेवारीला दिल्लीत सर्व विरोधकांची बैठक बोलाविली आहे. मात्र, डावे पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामगारांच्या संपावेळी हिंसाचार केल्याने बैठकीला येणार नसल्याचे ममता यांनी स्पष्ट केले आहे. यावर टीका करताना येचुरी म्हणाले,‘‘भाजप आणि संघाकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून लोकशाहीचे रक्षण करणे हे प्रत्येक देशभक्ताचे कर्तव्य आहे. स्थानिक पातळीवरील वाद आणि भांडणे हे या कर्तव्याच्या आड येता कामा नयेत.’’ पश्‍चिम बंगालच्या विधानसभेत नागरिकत्व कायद्याविरोधातील ठरावाची अडवणूक केल्याबद्दलही येचुरी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली.

JNU Attack: पोलिसांनी डाव्यांवरच ठेवला ठपका; आईशी घोषसह नऊ जणांची नावे जाहीर

‘कायद्याचा त्रास गरिबांनाच’
नागरिकत्व कायद्याचा सर्वाधिक त्रास देशातील गरिबांनाच होणार असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओबरायन यांनी केला आहे. हा निर्णय नोटाबंदीसारखाच असून, मध्यमवर्गीय, विद्यार्थी, नोकरदार आणि गरीब यांनाच याचा त्रास होणार आहे. माझ्या सर्व राजकीय कारकिर्दीत मी असा राजकीय गोंधळ कधी पाहिला नव्हता, असे ओबरायन म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Democracy should not be a local issue sitaram yechury