नोटाबंदीने अर्थव्यवस्थेची हानी : पी. चिदंबरम

पीटीआय
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या नोटांपैकी केवळ 13 हजार कोटी रुपयांच्या रद्द नोटा परत आल्या नाहीत. यासाठी देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) 1.5 टक्‍क्‍याने कमी झाले. 

- पी. चिदंबरम, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते 

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले. रोजगारात घट होण्यासोबत एकूण देशांतर्गत उत्पन्नही (जीडीपी) कमी झाले, अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केली. 

नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या नोटांपैकी 99.3 टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर चिदंबरम यांनी ट्‌विटरवर सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केवळ 13 हजार कोटी रुपयांच्या रद्द नोटा परत आलेल्या नाहीत. या नोटांसाठी देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता "जीडीपी' 1.5 टक्‍क्‍याने कमी झाला. यामुळे अर्थव्यवस्थेला 2.25 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 

नोटाबंदीनंतर 15.42 लाख कोटी रुपयांपैकी केवळ 13 हजार कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेकडे परत आलेले नाहीत. माझा असा संशय आहे की, हे 13 हजार कोटी रुपये नेपाळ व भूतानमध्ये असावेत आणि काही गहाळ अथवा नष्ट झालेले असावेत. नोटाबंदीनंतर तीन लाख कोटी रुपये परत येणार नाहीत, असे कोण म्हटले होते याची आठवण करा. याचा सरकारला फायदा होईल, असा दावा करण्यात आला होता,'' असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

Web Title: Demonetization damages economy says P Chidambaram