"डेऱ्या'तील प्रेमींनी धरला घरचा रस्ता

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

"डेरा'च्या नव्या संकुलापासून पाचशे मीटरच्या अंतरावर पोलिसांनी बॅरिकेड उभारले आहेत. "डेरा'च्या मुख्यालयामधून अनुयायांनी तातडीने बाहेर पडावे यासाठी पोलिस अधिकारी त्यांना विनंती करताना दिसतात

सिरसा - "डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू गुरमीत राम रहिम सिंग याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने साध्वींवरील बलात्कारप्रकरणी वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्याने त्याचे अनुयायी (प्रेमी) सैरभैर झाले आहेत. येथील "डेरा'च्या मुख्यालयात तळ ठोकून बसलेली मंडळी आता हताशपणे घराकडे परतताना दिसत आहेत. येत्या एक दोन दिवसांमध्ये डेराचा आश्रम पूर्णपणे रिकामा झालेला असेल, अशी शक्‍यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

डेराचा गड असणाऱ्या सिरसामधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून, येथील संचारबंदीही बारा तासांसाठी शिथिल करण्यात आली आहे.
दोन दिवसांमध्ये सिरसामध्ये एकही हिंसाचाराची घटना घडलेली नाही, येथील मोबाईल आणि इंटरनेट सेवाही पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. "डेरा'च्या नव्या संकुलापासून पाचशे मीटरच्या अंतरावर पोलिसांनी बॅरिकेड उभारले आहेत. "डेरा'च्या मुख्यालयामधून अनुयायांनी तातडीने बाहेर पडावे यासाठी पोलिस अधिकारी त्यांना विनंती करताना दिसतात.

डेऱ्यात केवळ कर्मचारी
डेऱ्याची लोकप्रियता वाढल्यानंतर बारा वर्षांपूर्वी येथे नवे संकुल तयार करण्यात आले होते, यानंतर हळूहळू त्याचा विस्तार होत गेला. डेराचे जुने संकुल या संप्रदायाचे संस्थापक मस्ताना बलुचिस्तानी यांनी उभारले होते. सध्या डेऱ्यामध्ये असलेले बहुतांश लोक हे तेथील कर्मचारी असावेत, असा संशय पोलिस उपायुक्त प्रभजोत सिंह यांनी व्यक्त केला. आज सकाळपासून सातशे अनुयायी डेऱ्यातून बाहेर पडले आहेत. त्यांना घरी जाता यावे म्हणून प्रशासनाने बसची सेवा देखील उपलब्ध करून दिली आहे.

बागपतमधील आश्रम रिकामा
सिरसा येथील डेऱ्यातील अठरा लहान मुलींचीही सुटका करण्यात आली आहे. काही मुलींनी डेरा सोडायला नकार दिला आहे. या मुलींना हरियानातील बालसुधार गृहांमध्ये ठेवले जाणार आहे. दरम्यान, डेराप्रमुखास न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर बागपतमधील त्याचा आश्रम स्थानिक प्रशासनाने रिकामा केला आहे. साडेसातशे एकरमध्ये हा आश्रम पसरलेला आहे. या आश्रमामध्ये केवळ आता सेवादारांनाच प्रवेश दिला जात आहे. या सेवादारांना पोलिसांनी वेगळी ओळखपत्रेही दिली आहेत.

भारतीय संत परंपरेने घालून दिलेले आदर्श आणि नियम यांचे विद्यमान संतांनी पालन करावे, एखादी व्यक्ती दोषी ठरल्याने संपूर्ण संत परंपरेलाच दोषी ठरविता येणार नाही. मागील दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे धार्मिक क्षेत्राची प्रतिमा मलीन होताना दिसते.
- रामदेवबाबा, योगगुरू

"डेरा'प्रमुखाविरोधातील खटल्याची सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काळजीपूर्वक ही स्थिती हाताळली, केवळ तीन तासांमध्ये त्यांनी बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंसाचारामध्ये मरण पावलेल्यांची जबाबदारी खट्टर यांनी स्वीकारण्याची गरज नाही.
थावरचंद गेहलोत, केंद्रीयमंत्री

Web Title: dera sacha sauda