हिंदू धर्म आणि हिंदुत्वामध्ये अंतर; राहुल गांधींनी सांगितला काय आहे भेद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

हिंदू धर्म आणि हिंदुत्वामध्ये अंतर; राहुल गांधींनी सांगितला काय आहे भेद

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी आज शुक्रवारी पक्षाच्या डिजीटल 'जन जागरण अभियाना'चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर सुरु असणाऱ्या वादावर आपलं मत मांडलंय. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, हिंदू धर्म आणि हिंदूत्व (Hinduism & Hindutva) यामध्ये काय फरक आहे? या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? जर त्या एकच असतील तर मग त्यांची नावे एकच का नाहीयेत? याचं कारण अर्थातच त्या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे वेगवेगळ्या आहेत. शिख आणि मुस्लिमांना मारणं म्हणजे हिंदू असणं आहे का? मात्र, हिंदूत्वाचा अर्थ तोच आहे.

हेही वाचा: CM योगींचं 'ते' भाषण ऐकून मोठ्या गुन्हेगारानं पत्करली शरणागती

यानंतर राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. त्यांनी म्हटलंय की, आज लोक हिंदू धर्म आणि हिंदुत्वाला एकच समजू लागले आहेत. मात्र, वास्तवात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यांनी पुढे म्हटलं की, आज आपल्याला हे आवडो अगर न आवडो, मात्र आरएसएस आणि भाजपच्या द्वेषपूर्ण विचारसरणीने काँग्रेसच्या प्रेमाच्या, आपुलकीच्या आणि राष्ट्रवादी विचारसरणीला अच्छादीत केलं आहे. आणि आपल्याला हे मान्य केलं पाहिजे. आमची विचारधारा जिवंत, चैतन्यशील आहे, पण ती ढासळली आहे.

काँग्रेस विचारसरणीचा प्रसार आवश्यक

राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, आपली विचारधारा आज देखील जिवंत आहे. मात्र, तिचा प्रभाव कमी झाला आहे. आपली विचारसरणी आज झाकोळली गेली आहे कारण आपण ती योग्य आणि आक्रमकरित्या आपल्याच लोकांमध्ये पसरवू शकलेलो नाही आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील

पुढे राहुल गांधी यांनी आपल्या योजनेबाबत माहिती देताना म्हटलं की, आपल्या काँग्रेसचा कोणताही व्यक्ती कितीही सिनीयर असो वा ज्यूनियर असो, त्याच्यासाठी ट्रेनिंग हे आवश्यकच आहे. सिस्टीमॅटीकली ट्रेनिंग आवश्यक आहे आणि आपल्याला ती संपूर्ण देशभर राबवायची आहे. जर आपल्याला आपल्या विचारधारेला संघटनेच्या मूळापर्यंत उतरवले तरच आपण पुढे जाऊ शकतो.

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन वाद

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचं नवं पुस्तक 'सनराईज ओव्हर अयोध्या' (Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times') वादात सापडलंय. या पुस्तकात त्यांनी हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हरामसारख्या कट्टरवादी संघटनांशी केलीय. त्यावरून आता वाद सुरू झालाय. याप्रकरणी खुर्शीद यांच्यावर दिल्लीत गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

loading image
go to top