मोदी गाढवासारखे काम करत आहेत: दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मोदीजी म्हणतात मी गाढवासारखे काम करतो आहे, मोदीजी तुम्ही खरेच बोलत आहात. तुम्ही गाढवासारखेच काम करता..

अहमदाबाद - प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना विविध राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर "शब्दसुमने' उधळायला सुरवात केली आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील प्रचारात चर्चेचा विषय ठरलेल्या गाढवाने आता गुजरातमध्येही प्रवेश केल्याचे दिसून येते.

पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या जातीतील आमदारांना गाढव म्हटले आहे, तर कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीही पंतप्रधान मोदी हे खरोखरच गाढवासारखेच काम करत असल्याचे विधान केले आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल म्हणाले ""बऱ्याचदा मला एवढ्या मोठ्या आंदोलनातून नेमके काय मिळाले, असा सवाल केला जातो? मी त्यावर आम्हाला 44 गाढव आमदार मिळाल्याचे सांगतो. ही मंडळी आमच्या समाजातील 14 तरुणांचा मृत्यू झाल्यानंतरदेखील गप्प बसली आहेत.''

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जाहीरसभेत महानायक अमिताभ बच्चन यांनी गुजरातमधील गाढवांचा प्रचार करू नये, असे म्हटले होते. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्युत्तर देत मी देशासाठी गाढवाप्रमाणे काम करत असून, देशातील सव्वाशे कोटी जनता माझी मालक आहे. गाढव हा प्राणी प्रामाणिक असतो, तो आपल्याला दिलेले काम पूर्ण करतो, असे म्हटले होते. मोदींच्या या ट्‌विटवर आज दिग्विजयसिंह यांनीही पंतप्रधानांवर उपरोधिक टीका केली. ""मोदीजी म्हणतात मी गाढवासारखे काम करतो आहे, मोदीजी तुम्ही खरेच बोलत आहात. तुम्ही गाढवासारखेच काम करता,'' असे ट्‌विट दिग्विजयसिंह यांनी केले आहे. मोदींवरील ही टीका अनेक नेटिझन्सना रुचली नसून, त्यांनी परत डिग्गीराजांना धारेवर धरले आहे.

Web Title: Digvijay criticizes PM