डिंपल यादव ठरल्या प्रभावशाली प्रचारक

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

समाजवादी पक्षाच्या "बहू'ने जिंकली जनतेची मने

लखनौ: उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षाची सर्वेसर्वा असलेल्या यादव कुटुंबातील मितभाषी "बहू' डिंपल यादव हिच्या वक्तव्याने मतदार भारावून गेल्याचे नुकत्यात संपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसून आले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी व मुलायम सिंह यांची सून अशी ओळख असलेल्या खासदार डिंपल यादव यांनी यंदा पक्षाचा राज्यभर झंझावाती प्रचार केला. त्यांच्या सभांना सर्वाधिक गर्दी झाली होती. त्यामुळेच समाजवादी पक्षाची नवी "स्टार' प्रचारक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

समाजवादी पक्षाच्या "बहू'ने जिंकली जनतेची मने

लखनौ: उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षाची सर्वेसर्वा असलेल्या यादव कुटुंबातील मितभाषी "बहू' डिंपल यादव हिच्या वक्तव्याने मतदार भारावून गेल्याचे नुकत्यात संपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसून आले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी व मुलायम सिंह यांची सून अशी ओळख असलेल्या खासदार डिंपल यादव यांनी यंदा पक्षाचा राज्यभर झंझावाती प्रचार केला. त्यांच्या सभांना सर्वाधिक गर्दी झाली होती. त्यामुळेच समाजवादी पक्षाची नवी "स्टार' प्रचारक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

डिंपल यादव यांनी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कनोजमधून विजय मिळविला. समाजवादी पक्षाची सून अशी ओळख त्या वेळी त्यांची होती. अगदी अलीकडच्या काळात "कौशल विकास' मोहिमेवर संसदेत लिखित भाषण वाचतानाही त्या चाचपडत असल्याचे दिसले. मात्र, स्वतःमधील त्रुटी प्रयत्नपूर्वक दूर करून विधानसभा निवडणुकीसाठी त्या समाजवादी पक्षाच्या प्रचारात पूर्ण तयारीने उतरल्या. श्रोत्यांना विशेषतः युवकांना भाषणात कसे गुंतवून ठेवायचे व त्यांच्यावर छाप कशी पाडायची, हे तंत्र त्यांनी आत्मसात केले.

प्रचारयात्रेत त्यांनी "बहू' व "भाभी' या दोन्ही भूमिका एकाचवेळी योग्य पद्धतीने निभावल्या. सभेत युवकांना उद्देशून त्या " तुमच्या भैयांकडे मी तुमची तक्रार करेन,' अशी ताकीद त्या प्रेमाने देत असत आणि त्याच वेळी ज्येष्ठ मतदारांची काळजी घेत "मुँहदेखी'च्या (विवाह सोहळ्यातील नववधूसंदर्भातील विधी) च्या रूपाने मला मतांची भेट द्या, असे आवाहन त्या करीत होत्या. अलाहाबादमधील एका सभेत पक्ष कार्यकर्ते संतप्त झाले होते, तेव्हा " तुम्ही मला बोलू देत नाही अशी तक्रार मी भैयांकडे (अखिलेश) करेन. भैया उद्या येथे येणार आहेत, असे सांगून डिंपल कार्यकर्त्यांना शांत करीत असत. जौनपूर येथील एका सभेत बोलताना त्यांनी ज्येष्ठ व तरुण मतदारांची मने जिंकून घेतली. ""मी प्रथमच पूर्वांचलमध्ये आले आहे. त्यामुळे मला "मुँहदेखी' मिळेल, असा विश्‍वास आहे, अशी भावनिक सुरवात त्यांनी ज्येष्ठ मतदारांना पाहून केली होती.

निवडणुकीपूर्वीच यादव घराण्यात मतभेद उफाळून आल्याने मुलायमसिंह व अखिलेश यादव या पिता-पुत्रात "मनभेद' झाला होता. पक्षात दोन गट पडल्याने पक्षाच्या प्रचाराची धुरा अखिलेश यांच्या खांद्यावर होती. या एकाकी लढतीत त्यांना पत्नी डिंपल यांचा भक्कम आधार मिळाला. त्यांची प्रचाराची सर्व सूत्रे हाती घेतली. समोर दिग्गज विरोधक असूनही व त्यांनी प्रचाराची खालची पातळी गाठली तरी डिंपल यादव यांनी अत्यंत सन्मानाने व सभ्यतेने त्यांना उत्तरे दिली. "मी उत्तर प्रदेशचा दत्तक पुत्र आहे,' असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात केले होते. त्यावर "मेरे आँगन में तुम्हारा क्‍या काम है,' अशी विचारणा त्यांनी केली होती.

पतीला पुरेपूर साथ
डिंपल यादव यांनी राज्यभरात अनेक प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असे. श्रोत्यांशी संवाद साधताना त्या उत्स्फूर्त भाषण करीत असत. ते लोकांना भावत असल्याने त्यांना मिळणारा प्रतिसाद अचंबित करणारा ठरला. या निवडणुकीत त्यांचा सहभाग केवळ प्रचारापुरता होता असे नाही, तर पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी पतीच्या वतीने त्यांनीच पडद्याआडून सूत्रे हलविली. निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करण्याच्या निर्णयातही त्यांचा मोठा सहभाग होता, असे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. समाजवादी पक्षाच्या प्रचारात त्यांच्या उपस्थितीने रंग भरत असे, तसेच युवा पिढी व महिलांनाही पक्षाशी त्या जोडून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

Web Title: Dimple Yadav proved effective preachers