निवृत्त कर्नलच्या घरात सापडले एक कोटी रोख, दुर्मिळ प्राण्यांचे कातडे

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

घरात तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना एक कोटी रुपये रोख, बंदी असलेल्या प्राण्यांचे 117 किलो मांस, अनेक जातींच्या हरणांची कातडे, अन्य काही प्राण्यांच्या कवट्या, कातडे, शिंग, वन विभागाशी संबंधित असलेल्या 40 रायफल्स आणि जवळपास 50 हजार काडतूसे सापडले.

मेरठ : येथील एका निवृत्त कर्नलच्या निवासस्थानी महसूल गुप्तचर संचालनालयाने टाकलेल्या छाप्यात एक कोटी रुपयांची रोख रक्कम, दुर्मिळ आणि बंदी असलेल्या प्राण्यांचे कातडे सापडले आहेत.

महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी रात्री उशिरा निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला. छापा मारणाऱ्या अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी कोणालाही आत येऊ दिले नाही किंवा बाहेरही जाऊ दिले नाही. घरात तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना एक कोटी रुपये रोख, बंदी असलेल्या प्राण्यांचे 117 किलो मांस, अनेक जातींच्या हरणांची कातडे, अन्य काही प्राण्यांच्या कवट्या, कातडे, शिंग, वन विभागाशी संबंधित असलेल्या 40 रायफल्स आणि जवळपास 50 हजार काडतूसे सापडले. घरातील नोकर आणि निकटवर्तीयांकडे चौकशी केल्यानंतर समजले की मागील काही दिवसातच नीलगायीची शिकार केली होती. सिविल लाईन्स येथील देवेंद्र कुमार यांच्या निवासस्थानी त्यांचा पुत्र राष्ट्रीय नेमबाज प्रशांत बिश्‍नोई राहत होता. देवेंद्र कुमार फार कमी वेळा येथे येत होते.

छापा मारला त्यावेळी घरात किती जण आणि कोण होते, याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे प्रकरण उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचे असण्याची शक्‍यता आहे. छापा टाकल्यानंतर काही वेळातच वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस प्रशांत बिश्‍नोई यांचा शोध घेत आहेत.

Web Title: directorate of revenue intelligence team raid in retired colonel house in meerut