'हा तर लोकशाहीवरचा हल्ला'; दिशा रवीच्या अटकेवरुन विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीच्या अटकेवरुन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला जातोय.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या गेल्या 80 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीतही आपल्या निर्धारांसह मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलनाला जागतिक पातळीवरुन देखील पाठिंबा मिळाला. पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्या ट्विटनंतर भारतात बराच हलकल्लोळ माजला. हा भारताच्या बदनामीचा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा संशय घेऊन  ग्रेटाने शेअर केलेल्या प्रोटेस्ट टूलकिटची तपासणी सध्या करण्यात येत आहे. सध्या याच प्रकरणामध्ये बंगलुरुमधील 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक करण्यात आली आहे. सध्या यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला जातोय.

हेही वाचा - 'भाजप आता नेपाळ-श्रीलंकेतही सरकार स्थापन करणार; अमित शहा यांचा मास्टरप्लॅन'

तिच्या अटकेनंतर मीना हॅरिस, सिताराम येच्यूरी, अभिनेता सिद्धार्थ यांसह अनेकांनी जोरदार टीका केली आहे. दिशा रवी हिच्या अटकेवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी ही अटक म्हणजे लोकशाहीवरचा अभूतपूर्व हल्ला असं म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 21 वर्षीय दिशा रवीची अटक होणे म्हणजे लोकशाहीवरचा अभूतपूर्व असा हल्ला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देणे म्हणजे अपराध नव्हे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट करत दिशाच्या अटकेचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटलंय की, बंदुकवाले एका निशस्त्र मुलीला घाबरतात. तर एक निशस्त्र मुलगीने हिंमतीचा प्रकाश पसरवला आहे. 

पोलिसांनी काल रविवारी म्हटलंय की, दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी अटक केली आहे. भारताच्या बदनामीच्या आंतरराष्ट्रीय कटाला मदत करण्याचा आरोप दिशावर लावण्यात आला आहे. दिशा ही फ्रायडेज फॉर फ्यूचर इंडिया या संस्थेची संस्थापक सदस्य आहे. 

काँग्रेस नेते आणि भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनीही याबाबतीत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी म्हटलंय की, मी दिशा रवीच्या अटकेचा निषेध करतो तसेच सर्व विद्यार्थी आणि युवकांना आग्रह करतो की त्यांनी या निरंकुश शासनाविरोधात आवाज उठवावा. जर माउंट कार्मेल कॉलेजमधील 22 वर्षीय विद्यार्थीनी आणि पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी देशासाठी धोका बनू शकत असेल तर सध्या भारत अत्यंत कमकुवत पायावर उभा राहिलेला आहे. चीनी सैनिकांद्वारे भारतीय भागात घुसखोरी करण्यापेक्षाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करण्यासाठीचे टूलकिट सर्वाधिक धोकादायक बनले आहे, असं देखील त्यांनी उपहासाने म्हटलं आहे. 

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी म्हटलंय की, भारतात शेतकरी आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी ज्याप्रकारे राजकीय विरोधाला आणि वैचारिक स्वातंत्र्यावर हल्ले होतायत त्यातीलच दिशाची अटक हे एक पाऊल आहे. भारत सरकारला जगात देशाची प्रतिमा खराब होण्याची चिंता नाहीये का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disha ravi arrest greta toolkit arvind kejriwal P Chidambaram