Diwali 2020: दिपोत्सवाने अयोध्या उजळली; गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रिकॉर्ड नोंद

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 14 November 2020

दिवाळी सण देशभरात साजरा केला जात आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

लखनौ- दिवाळी सण देशभरात साजरा केला जात आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये दिपोत्सव करण्यात आला. शुक्रवारी तब्बल 5,84,372 दिवे अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी लावण्यात आले होते. या दिपोत्सवाने सर्व अयोध्या उजळून निघाली होती. विशेष म्हणजे हा दिपोत्सव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाला आहे. 

उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स'च्या प्रतिनिधिंनी अयोध्येतील दिपोत्सव पाहिला. यादरम्यान मातीपासून बनवण्यात आलेले 5,84,372 दिवे लावण्यात आले होते. या भव्य आयोजनामुळे अयोध्येने आपले नाव रिकॉर्ड बुकमध्ये नोंदवले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रिकॉर्ड बनवल्याप्रकरणी सर्व राम भक्त आणि सर्व अयोध्येच्या नागरिकांचे अभिनंदल केले आहे. तसेच पुढील वर्षी हा रिकॉर्ड देखील तोडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

डिसेंबर महिन्यात एस्ट्राझेनेका लशीचे 10 कोटी डोस होतील उपलब्ध 

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी केली जाऊ शकते, यामुळे असे स्पष्ट होते. अयोध्येच्या रहिवाशांचे यामुळेही मी अभिनंदन करतो.  सामुहिक भागीदारी कोणत्याही उत्सवात अधिक आनंद भरते आणि संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे जाते. 

अयोध्येच्या शरयू तिरावर शुक्रवारी भव्य दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल तसेच राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी शरयू नदीची आरती केली. कोविड-19 च्या प्रोटोकॉलमुळे नव्या घाटावर विविध ठिकाणी आरती स्थळ बनवण्यात आले होते. दिपोत्सवात सहभागी होण्यासाठी अयोध्येत आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी सर्वात आधी राम जन्मभूमी मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे अनेक ट्रस्टी उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali 2020 ayodhya record in guinness book celebrating grand festival