आता बेशिस्तीला बसणार चाप; दंडातही भरघोस वाढ 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

बेशिस्त वाहतुकीला चाप लावणारे आणि रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करणारे महत्त्वाकांक्षी बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक आज प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांनी सुचविलेली दुरुस्ती सरकारने फेटाळून लावली.

नवी दिल्ली : बेशिस्त वाहतुकीला चाप लावणारे आणि रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करणारे महत्त्वाकांक्षी बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक आज प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांनी सुचविलेली दुरुस्ती सरकारने फेटाळून लावली. विधेयकाच्या बाजूने 108 तर विरोधात 13 मते पडली. गेल्या वर्षीपासून हे विधेयक राज्यसभेत लटकले होते. 
या विधेयकातून रस्ते अपघात रोखण्यावर भर देण्यात आला असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता मोठा आर्थिक दंडही होईल.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास आता दोन हजारांऐवजी दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, तर 'हिट अँड रन' प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड आकारण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. 

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत हे विधेयक मांडले. प्रदीर्घ चर्चेनंतर या विधेयकावर मतदान झाले. या वेळी 108 विरुद्ध 13 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात वाहतुकीचे नियम मोडल्यास अधिक दंड आकारण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी 'हिट अँड रन' प्रकरणात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना केवळ 25 हजार रुपयांची भरपाई मिळायची. आता ही रक्कम वाढवून दोन लाख रुपये करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या तरतुदी 

- हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड (सध्या 100 रुपये) 
(शिवाय वाहनचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी जप्त केला जाईल.) 
- परवान्याशिवाय गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड (सध्या 500 रुपये) 
- गाडी चालवताना फोनवर बोलल्यास पाच हजार रुपये दंड (सध्या एक हजार रुपये) 
- सीट बेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार (सध्या 100 रुपये) 
- बसमधून विना तिकीट प्रवास केल्यास दोनशे रुपयांऐवजी 500 रुपये दंड 
- अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास गाडीच्या मालकाला दोषी मानले जाईल. याप्रकरणी वाहनाच्या मालकाला 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल. 
- रुग्णवाहिकांना जाण्यासाठी प्राधान्य देणे बंधनकारक. रुग्णवाहिकेचा रस्ता अडवल्यास दहा हजार रुपये दंडाचा फटका बसणार. 

मोबाईलद्वारेच टोल भरा

नव्या विधेयकात अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी करतानाच वाहनचालकांसाठी नव्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता वाहनचालकांना मोबाईलद्वारेच टोल भरता येणार आहे. त्यामुळे आता कुणालाही टोल नाक्‍यावर थांबण्याची गरज पडणार नाही. 

घरबसल्या मिळणार वाहन परवाना 

काही खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले आहे, असे सांगतानाच आता वाहन शिकण्याचा परवाना देण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. त्यानुसार वाहन चालवण्याची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला घरी बसल्याच ऑनलाइनद्वारे वाहन शिकत असल्याचा परवाना दिला जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. 

108 
विधेयकाच्या बाजूने मते 

13 
विधेयकाच्या विरोधात मते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not Break Traffic Rules Huge Penalty will be Charged