esakal | दहशतवादाच्या बीमोडासाठी कटिबद्ध; डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

दहशतवादाच्या बीमोडासाठी कटिबद्ध; डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही

 कट्टरतावादी इस्लामी दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यास भारत आणि अमेरिका कटिबद्ध आहेत, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना इशारा दिला.

दहशतवादाच्या बीमोडासाठी कटिबद्ध; डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अहमदाबाद - कट्टरतावादी इस्लामी दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यास भारत आणि अमेरिका कटिबद्ध आहेत, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना इशारा दिला. भारत दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन देशांच्या मैत्रीचे गोडवे गात चीन आणि पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला. भारताबरोबर असलेल्या मैत्रीशी आम्ही प्रामाणिक राहू, असे आश्‍वासन ट्रम्प यांनी दिले, तर दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला आहे, असे मोदी यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प हे आज ‘एअर फोर्स वन’ या विशेष विमानातून सकाळी ११.३७ मिनिटांनी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची कन्या इव्हान्का आणि जावई जेरेड कुश्‍नर तसेच, अनेक वरिष्ठ अधिकारीही भारतात आले आहेत. 

भारतात येताच त्यांनी साबरमती आश्रमाला भेट देत महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. यानंतर मोटेरा स्टेडियमपर्यंतच्या ‘रोड शो’मध्ये सहभागी होत त्यांनी भारतीय जनतेच्या स्वागताचा स्वीकार केला. २२ किलोमीटरच्या या रोड-शोच्या मार्गावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोटेरा स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी भारतीयांचे स्वागताबद्दल आभार मानले. यावेळी एक लाखांहून अधिक लोक उपस्थित होते.  यावेळी ट्रम्प म्हणाले, ‘‘कट्टरतावादी इस्लामिक दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यास भारत आणि अमेरिका कटिबद्ध आहेत. पाकिस्तानबरोबरही आमची मैत्री असून याचा परिणाम म्हणून लवकरच दक्षिण आशियात शांतता निर्माण होईल. देशात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी भारतावर आहे.  दोन देशांमधील संरक्षण संबंधांचा विस्तार होत असून, एका विलक्षण अशा व्यापार करारावर आम्ही काम करत आहोत. आम्ही भारताला नवी शस्त्रेही देणार आहोत.’’   प्रेमभावनेने येणाऱ्यांचे अमेरिकेत स्वागत असले तरी कट्टरतावाद्यांना बंदी असल्याचे सांगत त्यांनी भारतीयांना दिलासा दिला. 

अमेरिकेच्या मोहिमांमुळे इराक आणि सीरियातून ‘इसिस’ नष्ट झाल्याचा दावाही त्यांनी केला. 

अमेरिकेचे भारतावर प्रेम असून या देशाशी असलेली मैत्रीशी आम्ही प्रामाणिक आहोत.’’ भारताबरोबर उद्या (ता. २५) तीन अब्ज डॉलरचे संरक्षण करार करणार असल्याचे जाहीर करत ट्रम्प यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वपूर्ण चर्चेची दिशाही स्पष्ट केली. 

व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्याचे राज्य, प्रत्येक मनुष्याचा आत्मसन्मान जपण्याची वृत्ती आणि सर्वधर्मसमभाव ही भारताची महान प्राचीन परंपरा असल्याचे गौरवोद्‌गार डोनाल्ड ट्रम्प यांनी या वेळी काढले. अमेरिका कायमच भारताचा प्रामाणिक मित्र राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. ट्रम्प म्हणाले, ‘‘दहशतवादी आणि त्यांच्या विचारधारेशी लढण्यास भारत आणि अमेरिका कटिबद्ध आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटनांना नष्ट करण्यासाठी आम्ही पाकिस्तानबरोबरही काम करत आहोत. भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र आहेत. या मैत्रीला आम्ही जगभरात प्रोत्साहन देत आहोत.’’ ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचेही कौतुक करताना ते ‘अद्वितीय नेते’ असल्याचे म्हटले. मोदींच्या चहाविक्रीच्या पार्श्वभूमीचा आणि २०१९ मधील विजयाचा संदर्भ देताना, ‘कष्टाने एखादा भारतीय काय साध्य करू शकतो, याचे मोदी हे जिवंत उदाहरण आहे,’ असे ट्रम्प म्हणाले. 

मैत्रीचे अविरत गुणगान
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमुळे भारत-अमेरिका मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. भारत आणि अमेरिकेमध्ये केवळ भागीदारी नसून, एक अत्यंत जवळचे आणि महान नाते निर्माण झाले आहे, असे ट्रम्प यांचे स्वागत करताना मोदी म्हणाले. भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू होत असताना नव्या संबंधांचा, आव्हानांचा, संधींचा आणि बदलांचा पाया रचला जात आहे, असे मोदींनी निदर्शनास आणून दिले. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाला उत्तर देताना मोदी म्हणाले, ‘‘एकविसाव्या शतकाची दिशा ठरविताना भारत आणि अमेरिकेतील मैत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका  असणार आहे. अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश असून, भारतीय लष्कर हे अमेरिकेबरोबरील आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या युद्धसरावात सहभागी झाले होते. नव्या दशकाची सुरुवात होत असताना ट्रम्प भारतात आल्याने नव्या संधींची कवाडे उघडली गेली आहेत.’’ देशातील १३० कोटी जनता मिळून नव्या भारताची निर्मिती करत असल्याचे सांगत मोदींनी भारताने नजीकच्या काळात मिळविलेल्या यशाचा आणि देशांतर्गत बदलांचा उल्लेख केला. 

भारत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट आणि मोटेरा येथे स्वागत समारंभाला उपस्थिती लावल्यानंतर जगप्रसिद्ध ताजमहाल पाहण्यासाठी आग्य्राकडे प्रयाण केले. येथे राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. सुमारे तासभर ताजमहालच्या परिसरात कुटुंबासह वेळ घालविल्यानंतर ते राजधानी दिल्लीला मुक्कामासाठी आले. उद्या (ता. २५) ते पंतप्रधान मोदींबरोबर हैदराबाद हाउस येथे महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन ते जर्मनीकडे रवाना होतील.  

ट्रम्प म्हणाले...
    जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत मानवतेचे आशास्थान
    लोकांवर बळजबरी न करता त्यांना मुक्त स्वातंत्र्य देत भारत मोठा देश बनला आहे. 
    पुढील दहा वर्षांत गरीबी हटवून भारत सर्वांत मोठा मध्यमवर्ग असलेला देश बनेल. 

मोदी  म्हणाले..
    हा दौरा अमेरिका आणि भारताच्या प्रगतीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा
    दहशतवाद्यांवर कारवाई आणि आरोग्य क्षेत्रातील अमेरिकेची कारवाई कौतुकास्पद
    एकमेकांवरील विश्‍वास हे दोन्ही देशांचे सामर्थ्य

loading image