अनुभवशून्यतेचा आरोप नका लावू; पुनावालांच्या वक्तव्याला भारत बायोटेकच्या चेअरमन्सनी दिलं उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी भारतातील ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने देशात दोन लशींना रविवारी मान्यता दिली आहे

नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी भारतातील ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने देशात दोन लशींना रविवारी मान्यता दिली आहे. DCGI ने ज्या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे त्यामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेकाची सीरम इन्स्टिट्यूटद्वारे तयार केली गेलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीद्वारे विकसित केलेली स्वदेशी लस कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. भारत बायोटेकचे चेअरमन डॉ. कृष्णा इल्ला यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, आमच्यावर अनुभवशून्य असल्याचा आरोप कुणीही करु नये, आम्ही अनेक लशीचे निर्माते आहोत.

पुढे त्यांनी म्हटलं की, आम्ही डेटाबाबत पारदर्शक नाहीयोत, असं म्हणणं चूक आहे. कारण आम्ही खूपच पारदर्शकपणे काम करत आहोत. एका दुसऱ्या कंपनीने आमच्याबद्दल म्हटलंय की आमची लस पाण्यासारखी सुरक्षित आहे. (सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी ही टीका केली होती.) लशीच्या परिणाम कारकतेबाबतच्या डेटाविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर त्यांनी म्हटलं की लस प्रभावी असल्याबाबतचा निर्वाळा देणारा डेटा मार्चपर्यंत उपलब्ध होईल.

हेही वाचा - सीरमच्या परवडणाऱ्या लशीची पुनावालांनी दिली माहिती; जाणून घ्या काय असेल किंमत

पुढे त्यांनी म्हटलं की सध्या तरी लशीचे 2 कोटी खुराक तयार आहेत. जुलै-ऑगस्टपर्यंत 15 कोटी खुराक तयार होतील. COVAXIN लस नव्या कोरोना स्ट्रेनवर प्रभावी आहे की नाही याबाबतची पुराव्यानिशी माहिती एका आठवड्यात आम्ही देऊ. आम्ही सुरक्षितता आणि रोगप्रतिकारशक्तीच्या संदर्भातील डेटा दिला होता. DCGI ने सुरक्षितता आणि रोगप्रतिकारशक्तीच्या आधारे मंजूरी दिली आहे. रोगप्रतिकारशक्तीचा थेट संबंध परिणामकारकतेशी आहे. मात्र, परिणामकारकतेबाबत सध्या मी कोणताही दावा करत नाहीये. 25 हजार लोकांच्या सुरक्षिततेबाबतचा डेटा आमच्याकडे आहे. एवढा डेटा इतर कोणत्याही कंपनीकडे नाहीये. सुरवातीला लशीची किंमत अधिक असेल मात्र जेंव्हा उत्पादन वाढेल आणि स्पर्धा वाढेल तेंव्हा किंमती कमी होतील.

एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी बॅकप लशीची गरज भासल्यास या लशीचा वापर करता येईल, असं म्हटलं होतं. यावर त्यांनी म्हटलं की टिव्ही चॅनेल्सवर कुणीही येतं आणि चिखल उडवून जातं आणि मग आपण ते साफ करत बसतो. जगात कुठेही काहीही बॅकप नावाचं नसतं. ही लस आहे फक्त. या प्रकारची वक्तव्ये करताना लोकांनी जबाबदारीने केली पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dont accuse us of inexperience says bharat biotech chairman krishna ella