सरकारच्या धोरणांवर टीका करू नका

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील वस्तू व सेवाकर विधेयक (जीएसटी) परिषदेमध्ये घेतलेल्या काही निर्णयांना केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभागाने विरोध करत काळ्या फिती घालून आंदोलन केले होते. यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने बजावले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकार अथवा त्यांच्या धोरणांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका-टिप्पणी केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिला. याधीही अधिसूचनेद्वारे कर्मचाऱ्यांना टीका करण्यापासून दूर राहण्याबाबत बजावले असल्याचे अर्थमंत्रालयाने आपल्या अध्यादेशात म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील वस्तू व सेवाकर विधेयक (जीएसटी) परिषदेमध्ये घेतलेल्या काही निर्णयांना केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभागाने विरोध करत काळ्या फिती घालून आंदोलन केले होते. यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने बजावले आहे.

"कोणताही कर्मचारी रेडिओ, टेलिव्हिजन अथवा इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांवर किंवा कोणतेही दस्तावेज प्रसिद्ध करून नावासह किंवा नावाविना किंवा इतरांच्या नावे किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून अथवा सार्वजनिकरीत्या सरकारच्या सध्याच्या अथवा आगामी धोरणांवर टीका अगर टिप्पणी करणार नाही. तसे केल्यास केंद्र सरकार अथवा राज्य सरकार संबंधितांवर कारवाई करेल,'' असे अर्थमंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

भारतीय महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी (उत्पादन शुल्क व सीमा शुल्क), अखिल भारतीय केंद्रीय अबकारीकर राजपत्रित अधिकारी संघटना, अखिल भारतीय केंद्रीय सीमाशुल्क निरीक्षक संघटना आणि अखिल भारतीय सीमा शुल्क आणि सेवाकर मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेच्या काही निर्णयांना विरोध करत आंदोलन केले होते.

दरम्यान, भारतीय महसूल अधिकारी (सीमाशुल्क व उत्पादन शुल्क) संघटनेचे अध्यक्ष अनुप श्रीवास्तव यांनी संघटनेच्या सदस्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात मत व्यक्त केले नसल्याचे सांगितले.

Web Title: don't criticize government schemes says finance ministry