गोव्यात घटक पक्षांनी भाजपची साथ सोडावी, काँग्रेसचा सल्ला

goa
goa

पणजी : सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे पाच वेळा करून थकलेल्या काँग्रेसने आज गोमंतकीय जनतेसाठी घटक पक्षांनी भाजपची साथ सोडावी असे भावनिक आवाहन केले. एका पक्षाच्या नावात गोमंतक आहे तर दुसऱ्या पक्षाच्या नावात गोवा आहे. त्यामुळे गोमंतक म्हणजेच गोवा वाचविण्यासाठी त्यांनी सद्सद्‌विवेक बुद्धीला स्मरून भाजपची साथ सोडावी असे आवाहन कॉंग्रेसचे प्रवक्ते अॅड यतीश नाईक यांनी पत्रकार परीषदेत केले.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाबाबत सरकारने फारच गोपनीयता बाळगली आहे. त्यांच्या आजारपणाविषयीही वेगवेगळी माहिती आजवर देण्यात आलेली आहे. खरेतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर फेब्रुवारीनंतर पूर्ण क्षमतेने मुख्यमंत्री म्हणून काम करू शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र ही वस्तुस्थिती जनतेपासून दडविली जात आहे. मुख्यमंत्री घरून कामकाज करतात अशी चुकीची माहिती दिली जात आहे. त्यांच्या आरोग्याविषयी अधिकृतपणे माहिती दिली जात नाही. हेल्थ बुलेटीन जारी करावे या मागणीचा आदर केला जात नाही.

अपचन, पोटदुखी, स्वादुपिंडाचा आजार अशी वेगवेगळी कारणे आजारपणाविषयी आजवर देण्यात आली. मुख्यमंत्री काम करू शकत नसल्याने प्रशासन कोलमडलेले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठका न झाल्याने सरकारी निर्णय होत नाहीत. राज्यासमोर भेडसावणाऱ्या समस्यांत वाढ होत आहे. खाणी कधी सुरु होतील याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले असतानाच सरकार काहीही करण्याच्या स्थितीत नाही अशी स्थिती आहे. बेरोजगार कधी रोजगार निर्मिती होईल याच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री कार्यरत नसल्याने सरकारमधील तीन हजार जागा भरणे शक्य होत नसल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. महागाईने कळस गाठला आहे. या जनता भरडून निघत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच अस्तित्वात नाही.

कॉंग्रेसने पाच वेळा राज्यपालांना या परिस्थितीत हस्तक्षेप करा अशी विनंती केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर केले. मात्र त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. आता भाजप दुसऱ्या क्रमांकाचा नेताही निवडू शकत नाही असे दिसून येते. एका मंत्र्याचे दुसऱ्या मंत्र्याशी, एका आमदाराचे दुसऱ्या आमदाराशी, मंत्री आमदारांचे प्रदेशाध्यक्षांशी, माजी मुख्यमंत्र्याचे प्रदेशाध्यक्षांशी भाजपमध्ये पटत नसल्याचे उघड झाले आहे. भाजपमध्ये सगळे गोंधळाचे वातावरण आहे. तोच गोंधळ प्रशासनतही प्रतिबिंबत होऊ लागला आहे. यामुळे जनतेचे नुकसान होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी सद्सद्‌विवेक बुद्धीला स्मरून भाजपची साथ घटक पक्षांनी सोडावी. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे सचिव विजय पै होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com