नितीश कुमारांसाठी दरवाजे बंद : तेजस्वी यादव 

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

तेजस्वी म्हणाले, की नितिश कुमार यांनी रविवारी रात्री फोन करून लालूप्रसाद यादव यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेबद्दल विचारणा केली. गेल्या चार महिन्यांपासून लालूप्रसाद यांच्यावर उपचार सुरु असताना आताच त्यांनी आपुलकीने विचारपूस का केली. नितीश कुमार यांच्याबरोबर नवीन आघाडी करण्यात आल्यास ते पुन्हा काही काळानंतर काडीमोड करणार नाहीत. याबद्दल विश्वास दाखवता येणार नाही. त्यामुळे नितीश कुमार यांना दरवाजे बंद आहेत. 

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाची (राजद) साथ सोडून भाजपसोबत गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता महाआघाडीचे दार बंद असल्याचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

नितीश कुमार हे नुकतेच लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला (जदयू) महाआघाडीचे दरवाजे पुन्हा उघडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जदयू आणि भाजपमध्ये मागील काही काळापासून  तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी एनडीएच्या बाहेर पर्याय शोधण्यास सुरवात केल्याची चर्चा आहे. मागील काही आठवड्यांपासून भाजप आणि जदयू यांच्यातील तिकीट वाटपावरून संघर्ष वाढत आहे. तसेच दोन्ही पक्ष आगामी लोकसभेच्या जागा स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील वर्षी राजद आणि काँग्रेस यांच्यासोबत असलेल्या महाआघाडीस सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीएचा रस्ता धरला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी नितीश कुमार यांना संधीसाधू असे म्हटले होते. 

तेजस्वी म्हणाले, की नितिश कुमार यांनी रविवारी रात्री फोन करून लालूप्रसाद यादव यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेबद्दल विचारणा केली. गेल्या चार महिन्यांपासून लालूप्रसाद यांच्यावर उपचार सुरु असताना आताच त्यांनी आपुलकीने विचारपूस का केली. नितीश कुमार यांच्याबरोबर नवीन आघाडी करण्यात आल्यास ते पुन्हा काही काळानंतर काडीमोड करणार नाहीत. याबद्दल विश्वास दाखवता येणार नाही. त्यामुळे नितीश कुमार यांना दरवाजे बंद आहेत. 

बिहारमध्ये प्रतिस्पर्धी असलेले नितीशकुमार आणि लालू यादव यांनी २०१५ साली एकत्र आले होते. काँग्रेसने तिघांची आघाडी उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या महाआघाडीने भाजपस पराभवाची धूळ चारली. राजदला या निवडणुकीत सर्वांत जास्त जागा मिळाल्यामुळे तेजस्वी यादव यांची सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका होती. मात्र यादव यांच्यावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने आरोप केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांनी राजद काँग्रेसबरोबर आघाडी तोडत भाजपच्या साथीने सत्तेत सहभागी झाले होते.

Web Title: Door is Closed For Nitish Kumar Says Tejashwi Yadav