पहिल्या महायुद्धानंतर महार रेजिमेंट संपली होती, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahar Regiment

पहिल्या महायुद्धानंतर महार रेजिमेंट संपली होती, पण...

संपूर्ण जगभरात भारतीय सैन्यदलाला आपल्या शौर्यामुळे, निडर व कर्तव्य कठोर परिश्रमामुळे व न्यायपूर्वक सचोटीमुळे आदराने पाहिलं जातं. भारतीय आर्मीची प्रत्येक रेजिमेंट आपल्या खास वैशिष्ट्यामुळे ओळखली जाते. अशा अनेक रेजिमेंट पैकीच एक आहे महार रेजिमेंट. सर्वात जुन्या रेजिमेंट पैकी एक असलेल्या महार रेजिमेंटने प्रत्येक युद्धात आपल्या उत्तुंग अशा पराक्रमाने देशाचं संरक्षण केलं आहे. या रेजिमेंटने आजवर १ परमवीर चक्र, ४ अशोक चक्र, ३२ वीर चक्र असे अनेक सन्मान मिळवले आहेत. महार रेजिमेंटचे धागेदोरे इतिहासात शोधता येतील. मध्ययुगातील अनेक सामाजिक बंधनांमुळे अनेक दलित समजल्या जाणाऱ्या जातींना सैन्यात संधी दिली जात नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राज्यकर्त्यांनी मात्र ही सामाजिक बंधने झुगारून दिली. त्यांच्या मावळ्यांमध्ये अठरापगड जाती जमातींचा समावेश होता. मात्र देशात इतरत्र हे चित्र सरसकट दिसत नव्हते. (Dr. Ambedkar's contribution to Restart Mahar Regiment)

जेव्हा युरोपीय व्यापाऱ्यांनी भारतात आपलं सैन्यदल उभारण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांनी उपेक्षित समाजातील तरुणांचा समावेश केला. इंग्रजांनी तर या महार तरुणांना भारतातच नाही तर परदेशातील मोहिमांसाठी पाठवलं जाऊ लागलं. १ जानेवारी १८१८ रोजी पुणे जिल्ह्यातील 'कोरेगाव भीमा' येथे झालेल्या दुसरा बाजीराव पेशवा व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील लढाईत महार गोलंदाज सहाय्यकांनी लक्षणीय मर्दुमकी गाजविली. इंग्रजांनी तेथे उभ्या केलेल्या विजयस्मारक स्तंभावरील लेखात त्या महार सैनिकांची नावे दिली आहेत. पुढे काठेवाड (१८२६), मुलतान (१८४६) व दुसऱ्या आंग्ल−अफगाण युद्धात (१८८०) कंदहार येथील लढायांत आणि वेढ्यांत महार जवानांनी तलवार गाजविली. मुंबईच्या वॉडबी मार्गावरील शिलालेखात तसे नमूद केले आहे. मेजर वॉडबी हा महार सैनिकांचा अधिकारी होता.

१८५७ सालच्या बंडानंतर मात्र या सैनिकांची भरणा करण्याविरुद्धचे धोरण ठरु लागले. ते जवळपास १८९३ पर्यंत चालले. त्यावर्षी आलेल्या महाबळेश्वर समितीच्या शिफारसी नुसार उपेक्षित जाती-जमातीच्या तरुणांचे सैन्य भरतीमधील प्रमाण वाढवण्यात आले. पुढे पहिल्या महायुद्धावेळी गणपत गोविंद व रावबहाद्दूर नाईक यांच्या खटपटीमुळे महार जवानांच्याच दोन कंपन्या तैनात करण्यास ब्रिटिश सरकारने हुकूम काढला. जुलै १९१७ मध्ये महारांची १११ वी पलटण खडी झाली परंतु १९२२ साली ही पलटण विघटित करण्यात आली. त्यानंतर १९२२ ते दुसरे जागतिक महायुद्ध सुरू होईपर्यंत महारांची लढाऊ सैनिकांची भरती होण्याचे थांबले पण महार जातीच्या पुढाऱ्यांनी नेट धरल्याने प्रारंभी रुग्णसेवा पथकात त्यांची भरती सुरू झाली.

हेही वाचा: डॉ. आंबेडकरांचे चलन निर्मितीवरील मत आजही महत्त्वाचे ...

महार रेजिमेंट उभी रहावी यासाठी पुढे आले दलितांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मच पिता रामजी संकपाळ हे ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार होते. यामुळेच बाबासाहेबांना लष्करी सेवेचं महत्व माहित होतं. त्यामुळेच ते भारतात परतले तेव्हापासून त्यांनी महार पलटण पुन्हा उभी राहावी यासाठी प्रयत्न सुरु केले. वेळोवेळी सभांमधून त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून सरकारला खडे बोल सुनावलेच शिवाय गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेल्यावर तिथे देखील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन महार रेजिमेंट पुन्हा उभी करण्यासंबंधी विचार विनिमय केला.

पुढे १९३९ साली युरोपात जेव्हा हिटलरच्या हुकूमशाही विरोधात दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा बाबासाहेबानी पत्रक काढून ब्रिटिश सत्तेला पाठिंबा दर्शवला मात्र भारतातील लष्करीबळ वाढवताना दलित तरुणांवरील अन्याय दूर केला जावा अशी जोरदार मागणी केली. इतकेच नव्हे तर ठिकठिकाणी फिरून त्यांनी अस्पृश्य समाजातील मुलांना लष्करात भरती व्हावे म्हणून आवाहन केले. १९४० सालच्या पूर्वार्धात त्यांनी सरकारशी वारंवार पत्रव्यव्हार करून महार पलटण उभी करण्यासंबंधी चळवळ चालू ठेवली आणि मागणी लावून धरली. याचाच परिणाम तत्कालीन गव्हर्नर यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महार रेजिमेंट उभी राहावी यासंबंधी पाऊल उचलले.

व्हाइसरॉयच्या कौन्सिल मध्ये संरक्षण विषयक सल्ल्लागार समितीमध्ये काम करताना देखील बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय तरुणांनी विशेषतः उपेक्षित समाजातील तरुणांनी लष्करात भरती होण्यासाठी जनजागृती केली. याचाच परिणाम महार रेजिमेंटच्या उभारणीमध्ये झाला.

सप्टेंबर १९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने बेळगाव (कर्नाटक) येथील मराठा रेजिमेंटच्या केंद्रात पहिली ऑक्टोबर महिन्यात व दुसरी जून १९४२ मध्ये अशा दोन महार पायदळ लढाऊ पलटणी खड्या केल्या. युद्धाचा व्याप वाढल्याने तसेच महार रेजिमेंटमधील जवानांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानेही त्यांच्या आणखी पलटणी उभ्या झाल्या. या पलटणींनी जपानी सैन्याविरुद्ध इंफाळ, आराकन (ब्रह्मदेश) येथील लढायांत उत्तम कामगिरी बजावली. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी या पायदळी पलटणींचे मध्यम मशीनगन पलटणीत रूपांतर करण्याचा निर्णय तत्कालीन सरसेनापती जनरल क्लॉड ऑकिन्लेक यांनी घेतला. त्यानुसार मद्रास रेजिमेंटच्या साहाय्याने १९४७ पर्यंत तीन पलटणींच्या मशीनगन पलटणीत रुपांतराचे काम पूर्ण झाले. स्वातंत्र्यापासून आजवर या महार पलटणीने काश्मीरच्या बर्फाळ खोऱ्यापासून ते राजस्थानच्या वैराण वाळवंटापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपला पराक्रम गाजवला आहे. भारतीय लष्कराचा अभिमान असणारी ही रेजिमेंट उभी राहण्याचं श्रेय जातं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीला.

Web Title: Dr Babasahebs Contribution To Restart Mahar Regiment Article By Bhushan Tare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top