नऊ महिन्यांनी डॉक्टरची सुटका; ते हेट स्पीच नव्हे एकता वाढवणारे भाषण : HC

kafeel khan
kafeel khan

गोरखपुर - उत्तर प्रदेशातील डॉक्टर काफिल कान यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तुरुंगात असलेल्या काफील खान यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत. तसंच काफील खान यांच्यावरील NSA सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टर काफील खान यांना ज्या हेटस्पीचसाठी 9 महिन्यांचा तुरुंगवास झाला ते भाषण एकता वाढवणारं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. गोरखपुरमध्ये ऑक्सिजनच्या प्रकरणानंतर काफील खान चर्चेत आले होते. गोरखपूरमधील बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमधून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. काफील खान यांनी CAA विरोधात प्रदर्शनावेळी हेटस्पीच दिल्यानं त्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला. 

उत्तर प्रदेशात तीन वर्षांपूर्वी गोरखपूरमध्ये बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लहान मुलांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या या प्रकरणानंतर ड्युटीमध्ये बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत डॉक्टर काफील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. 

मुलांच्या मृत्यू प्रकरणी बेजबाबदारपणा, भ्रष्टाचारासह अनेक आरोप डॉक्टर काफील खान यांच्यावर करण्यात आले होते. काफील यांनी आरोप फेटाळून लावताना हे षडयंत्र असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे प्राचार्य, CMO यांच्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांना दिली होती. तसंच ऑक्सिजनसाठी इतर रुग्णालयांशी संपर्क केला होता. 

डॉक्टर काफील यांच्यावरील कारवाईचा अनेक संघटना आणि IMA ने सुद्धा निषेध केला होता. काफील यांना विनाकारण या प्रकरणात गोवलं जात असून बळीचा बकरा केलं जात असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, 9 महिने तुरुंगात राहिल्यानंतर एप्रिल 2018 मध्ये काफील यांना जामिन मिळाला होता. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर काफील यांनी मुलांचा मृत्यू हा नरसंहार असल्याचं सांगत उत्तर प्रदेश प्रशासन जबाबादर असल्याचं म्हटलं होतं. 

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर 2019 मध्ये CAA विरोधात आंदोलनावेळी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसमोर काफील यांनी भाषण केलं होतं. यात त्यांनी भावना भडकावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने त्यांना 29 जानेवारीला मुंबईतून अटक केली होती. तेव्हापासून काफील मथुरा इथल्या तुरुंगात होते. डॉक्टर काफील यांनी NSA अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 11 ऑगस्टला सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 15 दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण करावी. 

उच्च न्यायालयाने मंगळवारी डॉक्टर काफील खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांची तात्काळ सुटका करावी असे आदेश दिले आहेत. CAA विरोधात त्यांनी केलेलं भाषण हेटस्पीच असल्याचं म्हटलं होतं. मात्र न्यायालयाने निर्णय देताना म्हटलं की, डॉक्टर काफील खान यांनी केलेलं भाषण हिंसाचार किंवा द्वेष भावना निर्माण करणारं नाही तर नागरिकांमध्ये एकता वाढवणारं होतं. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com