सीमाप्रश्‍नावर राजकीय तोडगा काढा - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

इथल्या मराठी माणसांच्या अस्मितेचा हा लढा आहे. एखाद्या भाषेची सतत गळचेपी केली, की लोक पेटून उठतात आणि लढायला व मरायलाही तयार होतात, हे सिद्ध झाले आहे. या प्रश्‍नावर राजकीय तोडगा काढण्याची गरज आहे, अन्यथा काहीही विपरीत घडू शकते,’ असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिला.

बेळगाव - ‘ज्यांना स्वत:चा इतिहास, भाषा आणि संस्कृती नसते, त्यांना माणसं म्हणायचं का? हा एक प्रश्‍न आहे. अशा स्थितीत आम्ही माणसं आहोत, हे सीमालढा सांगतो. इथल्या मराठी माणसांच्या अस्मितेचा हा लढा आहे. एखाद्या भाषेची सतत गळचेपी केली, की लोक पेटून उठतात आणि लढायला व मरायलाही तयार होतात, हे सिद्ध झाले आहे. या प्रश्‍नावर राजकीय तोडगा काढण्याची गरज आहे, अन्यथा काहीही विपरीत घडू शकते,’ असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिला.

बेळगुंदी (ता. बेळगाव) येथील श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे रविवारी (ता. ९) झालेल्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. कोत्तापल्ले बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते.

बोलणाऱ्यांचा बंदोबस्त खेदजनक
‘साहित्य कसं जगावं हे सांगतं, कसं सुसंस्कृत व्हावं आणि कसा विचार करावा हे सांगतं व माणसाला धैर्य देतं,’ असे डॉ. कोत्तापल्ले म्हणाले. ‘आज बोलणाऱ्यांचा बंदोबस्त केला जातोय,’ अशी खंत त्यांनी मांडली. धर्माच्या गैरवापराचा उल्लेख करून, ‘धर्म हा मोठ्या पदराचा असतो. नुसतं कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे,’ याची जाणीवही त्यांनी करून दिली.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘अनेक वर्षांपासून येथील लोक मराठीसाठी लढा देत आहेत, आंदोलने करीत आहेत. केवळ भाषेसाठी हुतात्मा झालेले लोक या भागातच आहेत. निजामाच्या राज्यातही कधी कुठल्या भाषेची गळचेपी झाली नाही. मुंबई प्रांत कराचीपासून धारवाडपर्यंत होता. दिल्लीपासून धारवाडपर्यंत मराठी शाळा होत्या. या प्रदेशात अनेक भाषक होते; मात्र त्यांनी कधी दुसऱ्या भाषेवर आक्रमण केले नाही; मात्र आता या भागात भाषेमधून सत्तेचे राजकारण सुरू आहे. परस्परांना समजून घेण्यासाठी भाषा असते, हे विसरून भाषेची दडपशाही सुरू आहे.’’

‘मराठी साहित्याची परंपरा बंडखोरीतून निर्माण झाली आहे. तुकाराम परखड लिहीत असत, म्हणून त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या गेल्या. संत तुकाराम, ज्ञानेश्‍वर, चोखामेळा हे सारे संत लोकांना शहाणे करत असत; मात्र आजही बाईला मंदिरात जाऊ दिलं जात नाही. बाई नसती तर जगच अस्तित्वात आलं नसतं,’ हे कसं विसरलं जातं, असा सवाल डॉ. कोत्तापल्ले यांनी केला.

Web Title: Dr Nagnath Kottapalle comment