अर्थव्यवस्थेला मिळणार गती; मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत 'मन की बात'

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

- पंतप्रधान मोदींनी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग विश्वातील तज्ज्ञांशी साधला संवाद. 

नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग विश्वातील तज्ज्ञांशी संवाद साधला. मोदी सरकारच्या (एनडीए-2) कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

निती आयोगाने आयोजित केलेल्या 'इकॉनॉमिक पॉलिसी - द रोड अहेड' या कार्यक्रमात 40 पेक्षा जास्त तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी या तज्ज्ञांशी संवाद साधत त्यांनी दिलेल्या सूचना लक्षात घेतल्या. ही चर्चा मुख्यत: क्षेत्रांशी संबंधित होती. मॅक्रो इकॉनॉमी आणि रोजगार, कृषी आणि पाणीसाठे, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली.

या कार्यक्रमाला वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल आणि सांखिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग हजर होते. यावेळी निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारीसुद्धा उपस्थित होते. निर्मला सितारामन 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 5 जुलैला लोकसभेत सादर करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economic Condition of Country may be Improve Soon