वीरभद्र सिंह यांचे फार्महाउस जप्त

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

कंपनीच्या फार्महाऊसवर 'ईडी' केलेली कारवाई राजकीय सुडभावनेतून आहे. माझ्याविरुद्धच्या खटल्याचा मी सामना करेन 
- वीरभद्रसिंह, मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश 

नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या दिल्लीतील महरौली भागातील फार्महाउसवर आज सक्तवसुली संचालनालयाने जप्ती आणली. या फार्महाउसची किंमत सुमारे 27 कोटी रुपये इतकी आहे.

हे फार्महाउस त्यांच्या मुलाच्या कंपनीच्या मेपल डेस्टिनेशन अँड ड्रीमबिल्डच्या नावावर आहे. वीरभद्र सिंह यांनी हे फार्महाउस 6.61 कोटींना विकत घेतले होते आणि हा पैसा त्यांच्या बेहिशेबी संपत्तीचा भाग असल्याचे 'ईडी'चे म्हणणे आहे. 

वीरभद्र सिंह यांची गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. ईडीची ही कारवाई सीबीआयकडून वीरभद्र सिंह, त्यांची पत्नी आणि अन्य जणांविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर झाली आहे.

सीबीआयने दहा कोटींच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. 2015 मध्ये ईडीने सीबीआयच्या तक्रारीच्या आधारावर मुख्यमंत्री आणि अन्य जणांविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. 

प्रकरण काय 
सीबीआयने वीरभद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध 2009 ते 2012 या काळात पोलादमंत्री असताना 6 कोटींची बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तत्पूर्वी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने 1 ऑक्‍टोबर 2015 रोजी आपल्या अंतरिम आदेशात त्यांच्या अटकेला आणि चौकशीला, तसेच आरोपपत्र दाखल करण्यास स्थगिती दिली होती.

अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सीबीआयला आदेशात सांगण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला दिल्ली उच्च न्यायालयात स्थलांतरित करण्यात आला. उच्च न्यायालयाने हिमाचल उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द केला आणि या आदेशानंतर काही तासांतच सीबीआयने याप्रकरणी पतियाळा हाउस कोर्टात वीरभद्र सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

सहा कोटींच्या बेकायदा मालमत्ताप्रकरणी एलआयसी एजंट आनंद चौहानला अगोदरच पोलिसांनी अटक केली आहे. सीबीआयच्या मते, वीरभद्र सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पदाचा गैरवापर करत जमा केलेल्या 6 कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली. हा पैसा शेतीतून आल्याचे वीरभद्र सिंह यांनी दाखवले होते. चुकीच्या पद्धतीने कसा पैसा गोळा केला याचा ठोस पुरावा आपल्याकडे असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. 

कंपनीच्या फार्महाऊसवर 'ईडी' केलेली कारवाई राजकीय सुडभावनेतून आहे. माझ्याविरुद्धच्या खटल्याचा मी सामना करेन 
- वीरभद्रसिंह, मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश 

Web Title: ED act against Himachal Pradesh CM Virbhadra Singh