कोचिंग क्‍लासच्या दबावामुळे विद्यार्थी आत्महत्येत वाढ 

पीटीआय
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

केरळला धान्य पुरविणार 
केरळला अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा करावा, अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सी. पी. नारायण यांनी सरकारकडे केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री ए. के. ऍन्टोनी यांनी त्याला पाठिंबा दिला. संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी सार्वजनिक वितरणासाठी धान्याचा पुरेसा पुरवठा सरकार करेल, अशी ग्वाही दिली.

नवी दिल्ली : परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी कोचिंग क्‍लासकडून विद्यार्थ्यांवर दबाब आणला जातो. यातून काही विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त होतात, असे सांगून त्यांच्या कामाची पाहणी करण्याची मागणी कॉंग्रेसच्या सदस्या विप्लवी ठाकूर यांनी राज्यसभेत गुरुवारी केली. 

प्रश्‍नोत्तराच्या तासात बोलताना विप्लवी ठाकूर म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वोत्तम गुण मिळविलेच पाहिजेत, असे सतत सांगून कोचिंग क्‍लासकडून विद्यार्थ्यांवर दबाब आणला जातो. राजस्थानमधील कोटा शहरात असे अनेक कोचिंग क्‍लास असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. अभ्यासासाठी पालकही मुलांवर अति दबाब आणतात. पालक व कोचिंग क्‍लासच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले विद्यार्थी अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, असे सांगून त्या म्हणाल्या, या कारणामुळे आतापर्यंत 100 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 

कोचिंग क्‍लासचालकांच्या कामकाजाची पाहणी करावी व तेथे विद्यार्थ्यांना खरे किती तास शिकविले जाते, हेही तपासावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली. सभागृहाचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी ठाकूर यांच्याशी सहमती दर्शविली. ते म्हणाले की, ठाकूर यांनी जो विषय उपस्थित केला आहे, तो अतिशय गंभीर आहे. अभ्यासासाठी मुलांवर मानसिक दबाब टाकून पालकही त्यांना कोचिंग क्‍लासला पाठवितात. या विषयावर सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आपण संबंधित मंत्र्यांपर्यंत पोचवू, असे आश्‍वासन नागरी विकास खात्याचे मंत्री वेंकय्या नायडू यांनी या वेळी दिले. सरकार यात लक्ष घालेल, असे कुरियन यांनी सांगितले. 

तमिळनाडूच्या प्रश्‍नांवर चर्चा 
तमिळनाडूतील इन्नोर बंदरावर तेल वाहतूक करणाऱ्या दोन टॅंकरची धडक होऊन तेल सांडले, हा विषय द्रमुक पक्षाचे कनिमोळी यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, ""अशी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमरता आहे. तेल पाण्यात पसरल्याने समुद्री कासवांसह सागरी जीवांना धोका उद्‌भवतो. मात्र, हे तेल काढून टाकण्यात सरकारच्या संबंधित विभागांचा समन्वय नसतो.'' मुसळधार पाऊस व चक्रीवादळाचा फटका तमिळनाडूला 2015मध्ये बसला होता. गेल्या वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण अल्प होते. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, हा प्रश्‍नही अनेक सदस्यांनी उपस्थित केला. 

केरळला धान्य पुरविणार 
केरळला अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा करावा, अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सी. पी. नारायण यांनी सरकारकडे केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री ए. के. ऍन्टोनी यांनी त्याला पाठिंबा दिला. संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी सार्वजनिक वितरणासाठी धान्याचा पुरेसा पुरवठा सरकार करेल, अशी ग्वाही दिली.

Web Title: Education Coaching class pressure Parliament Rajya Sabha strudents suicide