'पीएफ'ची रक्कम आता ऑनलाइन जमा होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जुलै 2017

नवी दिल्ली - कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाची शिल्लक रक्कम संबंधित संस्था, कंपन्यांना आता थेट भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) ऑनलाइन जमा करता येणार आहे. यासाठी "ईपीएफओ'ने सरकारी आणि खासगी बॅंकांशी आज करार केला. यामुळे प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम, निवृत्तिवेतन आणि विमा रकमेचेही ऑनलाइन वितरण होईल.

श्रम आणि रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या उपस्थितीत "ईपीएफओ'चे प्रतिनिधी आणि भारतीय स्टेट बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, अलाहाबाद बॅंक, इंडियन बॅंक, युनियन बॅंक या बॅंकांचे प्रतिनिधी यांच्यात करार झाला. या व्यतिरिक्त "ईपीएफओ'ने बॅंक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक या बॅंकांशीही करार केले आहेत.

या करारानुसार कोणत्याही गुंतवणूकदाराला प्रॉव्हिडंट फंडामध्ये शिल्लक रक्कम कोणत्याही अडथळ्याविना जमा करणे शक्‍य होईल. तसेच, कर्मचाऱ्यांना "पीएफ'ची रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यांमार्फत मिळू शकेल. करारावर सह्या झाल्यामुळे या बॅंकांमध्ये खाते असणारे गुंतवणूकदार "ईपीएफ'ची शिल्लक रक्कम थेट "ईपीएफओ'च्या खात्यामध्ये इंटरनेट बॅंकिंगचा वापर करून जमा करू शकतील. यापूर्वी शिल्लक "ईपीएफओ' रक्कम जमा करणे आणि लाभार्थींना रक्कम देण्यासाठी केवळ एकाच पर्यायाचा वापर केला जात होता. आता या करारानुसार बहुपर्यायी बॅंकिंग व्यवस्थेचा वापर होणार आहे. त्याआधारे वर उल्लेख केलेल्या बॅंकांच्या माध्यमातून शिल्लक "पीएफ' ऑनलाइन जमा करता येईल.

Web Title: efpo online payment marathi news sakal news india news