By Election: देशात 54 जागांवर पोटनिवडणूक, लक्ष मात्र मध्य प्रदेशातील 28 मतदारसंघांवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये भाजपने 30 हून अधिक जागांवर काँग्रेसमधून आयात झालेल्यांना उमेदवारी दिली आहे. 

नवी दिल्ली- मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 28 जागांसह 10 राज्यात विधानसभेच्या 54 मतदारसंघात आज (दि.3) पोटनिवडणूक होत आहे. मध्य प्रदेशमध्ये ही पोटनिवडणूक शिवराजसिंह चौहान सरकारचे भवितव्य ठरवणार आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये भाजपने 30 हून अधिक जागांवर काँग्रेसमधून आयात झालेल्यांना उमेदवारी दिली आहे. 

उत्तर प्रदेश विधानसभेत बहुमत असणाऱ्या भाजपने सात जागांवर आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेवरुन योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा- आमदारकीच्या राजीनाम्यासाठी भाजपने दिले 5 कोटी; काँग्रेसचे स्टिंग ऑपरेशन

प्रचारादरम्यान 'लव्ह जिहाद'चा मुद्दा उपस्थित झाला आणि उत्तर प्रदेश व हरियाणा सरकारांनी याविरोधात कायदा आणण्याची घोषणाही केली. गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यानंतर आठ जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. यापैकी पाच भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढत आहेत. 

त्याचबरोबर छत्तीसगड (1), हरियाणा (1), झारखंड (2), कर्नाटक (2), नागालँड (2), ओडिशा (2) आणि तेलंगणा (1) येथे पोटनिवडणूक होत आहे. 

हेही वाचा- सॉलिसिटर जनरल 'बिझी'; लोन मॉरेटोरियमवरील सुनावणी ढकलली पुढे

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला. तर मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिग्विजय सिंह, राजस्थाने माजी उपमुख्यमंत्री भूपेश बघेल आदी नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. काँग्रेस नेत्यांनी बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य यांच्यावर निशाणा साधत त्यांना 'गद्दार'ची उपमा देत टीका केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By elections in 54 seats of assembly in country all eyes on MPs 28 assembly seats