Twitter : ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना ‘कू’चा आधार

कंपनीचा नोकरी देण्याचा निर्णय : उत्तम कर्मचाऱ्यांना योग्य स्थान मिळायला हवे
Koo and Twitter
Koo and Twitter

नवी दिल्ली : ट्विटरमधून काढून टाकलेल्या काही कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची घोषणा ट्विटरची प्रतिस्पर्धी भारतीय मायक्रो-ब्लॉगिंग कंपनी ‘कू’ने केली आहे. ट्विटरच्या सुमारे १२०० कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असून, ट्विटरवर आरआयपी ट्विटर (#RIPTwitter)या ट्रेंडने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर ‘कू’चे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

‘आम्ही काही माजी ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावर घेऊ. आम्ही विस्तार करताना अशा कर्मचाऱ्यांना संधी देऊ. उत्तम कर्मचाऱ्यांना योग्य स्थान मिळाले पाहिजे.’ असे मयंक बिदावतका यांनी म्हटले आहे.एलॉन मस्क यांनी काढून टाकलेल्या किंवा नोकरी सोडण्यास सांगितल्यानंतर स्वेच्छेने ती सोडलेल्या काही ट्विटर कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यास तयार असल्याचे बिदावतका यांनी म्हटले आहे.

ट्विटरनंतर जगातील दुसरा सर्वांत मोठा मायक्रोब्लॉग असल्याचा दावा ‘कू’ ने केला आहे. मार्च २०२०मध्ये दाखल झाल्यापासून आतापर्यंत पाच कोटींहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या हे अॅप दहा भाषांमध्ये उपलब्ध असून, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा, नायजेरिया,संयुक्त अरब अमिराती, अल्जेरिया, नेपाळ, इराण आणि भारत यासह १०० हून अधिक देशांमध्ये याचे वापरकर्ते आहेत. हे अॅप दाखल झाल्यापासून ट्विटरच्या ब्लू टिक समतुल्य असलेल्या ७५००पेक्षा अधिक यलो टिक्स आणि लाखो ग्रीन सेल्फ व्हेरिफिकेशन टिक्स दिल्याचा दावाही ‘कू’ ने केला आहे.

सॉफ्टवेअर अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश

ट्विटरच्या सुमारे १२०० कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज एलॉन मस्क यांनी सॉफ्टवेअर अभियंत्यांना संदेश पाठवत ट्विटरच्या सॅनफ्रान्सिस्को कार्यालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला. तसेच सहा महिन्यातील कामाचा एक अहवाल देण्यासही सांगितले. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यात शारीरिक अडचण आहे किंवा ज्यांना काही घरगुती गंभीर अडचण आहे, त्यांना यातून सवलत देण्यात आली. मस्क यांनी कंपनी ताब्यात घेताच ७५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com