esakal | आणीबाणी 2.0 मध्ये सहर्ष स्वागत; दिल्लीत महाराष्ट्र सदनासमोर भाजपनं लावलं पोस्टर
sakal

बोलून बातमी शोधा

emergency 2 in maharashtra

अर्णब गोस्वामी यांच्या या अटकेचा निषेध करत गृहमंत्री अमित शहांपासून ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांनी ट्विट करत आपला आक्षेप नोंदवला आहे. 

आणीबाणी 2.0 मध्ये सहर्ष स्वागत; दिल्लीत महाराष्ट्र सदनासमोर भाजपनं लावलं पोस्टर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

काल बुधवारी रिपब्लिक चॅनेलचे संपादक आणि सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या राहत्या घरातून सकाळी रायगड पोलिसांनी अक्षरश: उचलून नेले. गेले काही दिवस अर्णब गोस्वामी हे टीआरपी घोटाळ्यासंदर्भात सातत्याने चर्चेत आहेत. मात्र, आताची ही अटक त्यासंदर्भात नसून अन्वय नाईक आत्महत्त्या प्रकरणात करण्यात आली आहे. या अटकेचा  भारतीय जनता  पार्टीकडून जोरदार निषेध नोंदवण्यात आला आहे. यातच आता भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर महाराष्ट्रात दुसरी आणीबाणी सुरु असल्याचा दावा करत एक पोस्टर लावले आहे. 

हेही वाचा - मध्य प्रदेशात चीनच्या फटाक्यांवर बंदी; स्थानिकांच्या रोजगारासाठी भाजप सरकारचा मोठा निर्णय

काय आहे प्रकरण?
5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव होतं. सुमारे पाच कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आणि न्यायाची मागणी केली. आणि आता या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या घरी शिरुन अटक करण्यात आली आहे. 

भाजपचा जोरदार विरोध
या अटकेचा भाजपकडून जोरदार विरोध नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या या अटकेचा निषेध करत गृहमंत्री अमित शहांपासून ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांनी ट्विट करत आपला आक्षेप नोंदवला. तसेच महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी भाजपकडून रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवण्यात आला आहे. भाजपकडून या प्रकाराची आणीबाणीशी थेट तुलना करण्यात आली आहे. ही स्वतंत्र माध्यमांची घुसमट असून लोकशाहीची हत्या आहे, असाही आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आणि आता भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांच्याकडून दिल्लीतील महाराष्ट्र सदनासमोर यासंदर्भात पोस्टरच लावण्यात आले आहे. 

हेही वाचा - Bihar Election : नितीश कुमार तीनवेळा मुख्यमंत्री मात्र एकदाही विधानसभेवर नाही

काय आहे हे पोस्टर?
तेजिंदरपाल सिंह बग्गा यांच्याकडून लावलेल्या या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चित्र आहे. यावर आणीबाणी 2.0 असे लिहले आहे. आणीबाणी 2.0 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे, असं या पोस्टरवर लिहण्यात आले आहे. 

loading image