मध्य प्रदेशात चीनच्या फटाक्यांवर बंदी; स्थानिकांच्या रोजगारासाठी भाजप सरकारचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

राज्य सरकारने चीनमध्ये अथवा विदेशात तयार केलेल्या फटाक्यांचा संग्रह करणे, त्यांची विक्री करणे आणि त्यांचा वापर करणे यावर बंदी घातली आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारने येत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात चीनच्या फटाक्यांवर  बंदी घालण्याचा निर्णय काल बुधवारी घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाद्वारे केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, या प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवर कारवाई करण्यात येईल. मिळालेल्या माहीतीनुसार, युवकांच्या एका समुहाने हिंदू देवी-देवतांचे चित्र असलेले फटाके न विकण्याबाबत सूचना दिली आहे. मात्र, कार्यालयाद्वारे केलेल्या ट्वीटमध्ये हिंदू देवी-देवतांचे चित्र असलेल्या फटाक्यांबाबत कसलाही उल्लेख केला नाहीये. 

हेही वाचा  - Bihar Election : नितीश कुमार तीनवेळा मुख्यमंत्री मात्र एकदाही विधानसभेवर नाही

शिवराज सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय
मध्य प्रदेशच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितलं की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील कायदाव्यवस्थेच्या संदर्भात आज मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की राज्यात चीनच्या फटाक्यांची विक्री करणे तसेच त्यांचा वापर करण्यावर बंदी राहील. केंद्रीय वाणीज्य मंत्रालयाच्या गाईडलाईन्स लक्षात घेता राज्य सरकारने चीनमध्ये अथवा विदेशात तयार केलेल्या फटाक्यांचा संग्रह करणे, त्यांची विक्री करणे आणि त्यांचा वापर करणे यावर बंदी घातली आहे. 

हेही वाचा - Bihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका

स्थानिक उत्पादनांना मिळावी चालना
बुधवारी झालेल्या बैठकीत चौहान यांनी या नियमांचे पालन न करण्यावर 'एक्सप्लोसिव्ह ऍक्ट' (विस्फोटक अधिनियम) च्या संबंधित कलमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यांनी राज्यातील जनतेला विनंती केली की, आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी स्थानिक उत्पादनेच खरेदी केली जावीत. त्यांनी म्हटलं की, दिवाळीच्या दरम्यान मातीचेच दिवे खरेदी करा जेणेकरुन स्थानिक कुंभारांना त्यातून रोजगार मिळेल. 

या बैठकीत मध्य प्रदेशचे अपर मुख्य सचिव डॉ. राजेश राजौरा यांनी सांगितलं की विस्फोटक अधिनियमांच्या कलम 9-बी (1) (बी) च्या अंतर्गत अवैध फटांक्याचा साठा करणे, त्यांचे वितरण आणि विक्री करणे तसेच त्यांचा उपयोग करणे यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. यासाठी दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यांनी सरतेशेवटी विनंती केली की राज्यात कुणीही अशा फटाक्यांचा साठा, विक्री आणि वापर करु नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh shivraj singh chouhan bans Chinese crackers to promote local products