डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर

पीटीआय
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

ब्राझील यंदा यजमान
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या महत्त्वाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या पाच देशांची संघटना आहे. ब्राझीलमध्ये होत असलेल्या ब्रिक्‍सच्या अकराव्या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी हे पाचही देशांच्या प्रमुखांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या परिषदेचे यजमानपद ब्राझीलकडे आहे.

नवी दिल्ली - जगातील पाच महत्त्वाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर ‘ब्रिक्‍स’ परिषदेमध्ये भर दिला जाणार आहे. त्यात प्रामुख्याने डिजिटल अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि दहशतवादाविरोधातील लढाईतील सहकार्य यांचा समावेश असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ब्राझीलमध्ये १३ व १४ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या ब्रिक्‍स देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना झाले. ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात मोदींनी म्हटले आहे की, या दौऱ्यात आपण ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारे यांची भेट घेणार असून, द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

नावीन्यपूर्ण भविष्यासाठी आर्थिक विकास हा मुद्दा समोर ठेवून ब्रिक्‍सचे सदस्य असलेल्या पाचही सदस्य देशांमधील संबंध अधिक बळकट करण्याबाबत आपण इतर नेत्यांशी संवाद साधणार आहोत, असेही मोदींनी म्हटले आहे. 

ब्रिक्‍सच्या सदस्य देशांतील संबंधांमध्ये उद्योग आणि व्यापार क्षेत्राने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे ब्राझील दौऱ्यात त्यावर विशेष भर दिला जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasis on the digital economy