केंद्राच्या दाव्यानुसार देशात रोजगार वाढले | Employment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

employment
दुसऱ्या तिमाहीत सरकारच्या लेखी रोजगार वाढले

केंद्राच्या दाव्यानुसार देशात रोजगार वाढले

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे आर्थिक व्यवहारांना आणि पर्यायाने रोजगाराला फटका बसल्याची चिंता व्यक्त होत असताना श्रम मंत्रालयाच्या दाव्यानुसार देशात रोजगारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वर्तमान आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच (जुलै - सप्टेंबर- २०२१) या कालावधीत दोन लाख लोकांना रोजगार मिळाल्याचे श्रम मंत्रालयाकडून सांगण्यात आले. (Corona Period Jobs)

श्रम मंत्रालयाचा आस्थापनांशी संबंधित दुसरा त्रैमासिक सर्वेक्षण अहवाल आज केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रकाशित केला. कृषी व्यतिरिक्त उर्वरित आस्थापनाप्रकारापैकी उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि उपाहारगृहे, माहिती तंत्रज्ञान/बीपीओ आणि आर्थिक बाबींशी संबंधित सेवा या नऊ निवडक क्षेत्रांमधील रोजगाराच्या अध्ययनाचा यात समावेश आहे.

हेही वाचा: लॉकडाऊनमधील नुकसान भरपाई; खाजगी बस ठेकेदारांना PMP कडून ९९ कोटी

पहिल्या तिमाहीचा अहवाल मागील वर्षी २७ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला होता. त्यात या नऊ क्षेत्रांमध्ये सहाव्या आर्थिक जनगणना अहवालात (२०१३-१४) दिसलेल्या एकूण २.३७ कोटी रोजगारांच्या तुलनेत २९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आणि एकूण रोजगार सुमारे ३.०८ कोटीपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले होते. त्यापार्श्वभूमीवर दुसऱ्या त्रैमासिक अहवालानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये दोन लाख रोजगार वाढले असून एकूण रोजगार ३.१० कोटी झाले आहेत.

अशीही वाढ

श्रम मंत्रालयाचा हा अहवाल सांगतो, की सर्वाधिक रोजगार उत्पादन क्षेत्रात वाढले आहेत. या क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण ३९.१ टक्के असल्याचे दिसून आले आहे. त्याखालोखाल शिक्षण क्षेत्रात (२२ टक्के) आरोग्य तसेच माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनुक्रमे १०.८ टक्के आणि १०.७ टक्के वाढ झाली आहे तर व्यापार आणि वाहतूक या क्षेत्रांमधील रोजगारांची वाढ अनुक्रमे ५.३ टक्के आणि ४.६ टक्के आहे. या तुलनेत आर्थिक सेवांतील रोजगार २.८ टक्के, निवास आणि उपाहारगृहे क्षेत्रातील २.५ टक्के, तर बांधकाम क्षेत्रातील रोजगार २ टक्के आहे.

हेही वाचा: काशी विश्वनाथाच्या सेवेकऱ्यांना PM मोदींकडून खास भेट

संस्थात्मक रोजगारात वाढ

या अहवालानुसार नऊ क्षेत्रांमधील ८७ टक्के कर्मचारी नियमित आहेत. तर केवळ २ टक्के कर्मचारी अस्थायी स्वरूपाचे आहेत. बांधकाम क्षेत्रात २० टक्के कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचे तर ६.४ टक्के स्थायी आहेत. देशात रोजगाराच्या संधी वाढत असल्याचा दावा श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी केला. मागील तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीमध्ये दोन लाख रोजगारांची संधी वाढली आहे. प्रामुख्याने ही वाढ संस्थात्मक रोजगारामध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaEmployment
loading image
go to top