पाकिस्तानचे आरोप म्हणजे रिकाम्या भांड्यांचा खडखडाट: पर्रीकर 

पीटीआय
शनिवार, 15 एप्रिल 2017

भले ते स्वत:ला कितीही ताकदवान समजत असले, तरीही भारताने प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली तर त्यांच्याकडे लढण्याची ताकदच नाही, हे पाकिस्तानने लक्षात घेतले पाहिजे.

पणजी : 'पाकिस्तान भारतावर करत असलेले आरोप म्हणजे रिकाम्या भांड्यांचा आवाज आहे. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही,' अशी प्रतिक्रिया माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (शनिवार) व्यक्त केली. 'डीडी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हे उत्तर दिले. 

नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने भारताचा 'हेर' ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचे भारतात तीव्र पडसाद उमटले आहेत. 'जाधव यांना फाशी दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील,' असा इशाराही भारताने दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पर्रीकर यांनी हे वक्तव्य केले. 

पर्रीकर म्हणाले, "सतत चर्चेमध्ये राहण्यासाठी आणि त्यांच्या जनतेला गुंतवून ठेवण्यासाठी पाकिस्तानला सतत काही ना काही कारण हवे असते. हा त्यांचा खेळ धोकादायक आहे. भले ते स्वत:ला कितीही ताकदवान समजत असले, तरीही भारताने प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली तर त्यांच्याकडे लढण्याची ताकदच नाही, हे पाकिस्तानने लक्षात घेतले पाहिजे. पण आपल्याला शांतता हवी आहे. आम्ही कुणाच्या कुरापती काढत नाही.'' 

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत जी कृती केली आहे, त्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आम्ही शांत बसणार नाही. जाधव यांना फाशी दिलीच, तर एक देश म्हणून आपण पाकिस्तानला कठोर समज देण्यास सक्षम आहोत. 'आम्ही अण्वस्त्र सज्ज आहोत' अशा बढाया पाकिस्तान मारत होते. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांची ही बडबड बंद झाली. 'पाकिस्तान भारताला ब्लॅकमेल करू शकत नाही' ही अक्कल आता तरी त्यांना आली असेल. 
- मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले पाहिजे, अशी मागणी पर्रीकर यांनी केली. "सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे, की जाधव यांचे अपहरण झाले आहे. ते पाकिस्तानमध्ये नव्हतेच. ते इराणमध्ये होते. इराणच्या माहितीनुसार, तालिबानने जाधव यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांना पाकिस्तानमध्ये नेण्यात आले. असा खोडसाळपणा करण्याची पाकिस्तानला सवयच आहे,' असे पर्रीकर म्हणाले. 

Web Title: Empty vessels make the most noise, says Manohar Parrikar on Pakistan in the cotext of Kulbhushan Jadhav