नरेंद्र मोदींच्या मणिनगरमध्ये काँग्रेसचे 'ब्रह्मास्त्र' ?

shweta brahmbhatt
shweta brahmbhatt

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तेरा वर्षे ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले त्या मणिनगर मतदारसंघाकडे केवळ गुजरातचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ 1990 पासून काँग्रेसच्या हातातून निसटला तो आजपर्यंत ताब्यात आला नाही. यावेळी मात्र काँग्रेसने श्‍वेता ब्रह्मभट्ट या ग्लॅमरस युवतीला उमेदवारी दिल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. 

या मतदारसंघाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते की 1975 मध्ये येथून नवीनचंद्र बारोट हे राष्ट्रीय मजदूर पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1980.1985 मध्ये काँग्रेसचे रामलाल रुपलाल हे विजयी झाले होते. त्यानंतर म्हणजे 1990 नंतर हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला आहे. मणिनगर भाजपचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1990 ते 1998 पर्यंत भाजपचे कमलेश पटेल हे निवडून आले होते. त्यानंतर 2002 ते 2014 पर्यंत नरेंद्र मोदी निवडून येत होते.(पंतप्रधान होईपर्यंत). मोदी पंतप्रधान बनल्यानंतर येथे 2014 मध्ये पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे सुरेश पटेल निवडून आले. आता 2017 मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेश पटेल यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. येथे पुन्हा भाजपच निवडून येईल असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे असले तरी या मतदारसंघात श्वेता हिने झंझावती प्रचार करून पटेल यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे. 

कोण आहे श्‍वेता ? 
श्वेता उच्चशिक्षित आहेत. वेस्टमिंस्टर बिजनेस स्कूलमधून तिने पोस्ट ग्रॅज्यूऐशन केले आहे. तसेच "आयआयएम'मधून पॉलिटिकल लीडरशिपची पदवी संपादन केली आहे. या मतदारसंघात 70 टक्‍क्‍याहून अधिक मतदार हे युवक आहेत. श्‍वेताचे वडील नरेंद्र ब्रह्मभट हे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसकडून जेंव्हा तिकिटासाठी विचारणा झाली तेंव्हा तिचे वडील खंबीरपणे तिच्या मागे उभे राहिले. स्वत: नरेंद्रभाईंनी महापालिकेची निवडणुकही लढली होती. त्यामुळे घरातच राजकारणाचे वातावरण आहे. माझ्या वडीलांनी पाठिंबा दिल्याने मी निवडणुकीच्या रणांगणात उतरले असे तिचे म्हणणे आहे. विशेषत: तरूण आणि महिलांच्या प्रश्‍न सोडविण्यात मला रुची आहे. महिलांचे सबलीकरण हे माझे ध्येय असल्याचे श्‍वेता यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, श्‍वेता या भाजपचे वजनदार नेते सुरेश पटेल यांच्याशी सामना करीत आहेत. पटेल यांच्या तुलनेत श्‍वेता खूपच ज्यूनियर असल्या तरी त्यांच्या उमेदवारीमुळे मणिनगरची लढत यावेळी रंगणार आहे. श्‍वेता ज्या ठिकाणी जातील तेथे गर्दी खेचत असल्याचे चित्रही पाहण्यास मिळत आहे. एखाद्या मॉडेलप्रमाणे दिसणाऱ्या श्‍वेता यांची भाषणे ऐकण्यासाठीही लोक मोठ्यासंख्येत सभेला येत आहेत. यावेळी सुरेश पटेल विरूद्ध श्‍वेता ब्रह्मभट हा सामना चांगलाच रंगात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com