eSakal Survey : 2024 साठी जनतेची मोदी सरकारलाच पसंती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

modi

सरकारच्या कामगिरीविषयी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर लोकांनी संमिश्र स्वरुपाची मतंही नोंदवली आहेत. तर पाहुयात विविध आघाड्यांवरील सरकारची कामगिरी.

eSakal Survey : 2024 साठी जनतेची मोदी सरकारलाच पसंती!

पुणे - केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तर सलग दोन कार्यकाळ मिळून मोदी सरकारचे ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या कारभारावर जनतेचं काय म्हणणं आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न ई-सकाळनं ऑनलाईन सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला. या सर्वेक्षणाला जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. तसेच २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकारच सत्तेत यावं असा कौलही दिला. या सर्वेक्षणात ८८ तासांत ८,१८० लोकांनी सहभाग नोंदवला. सरकारच्या कामगिरीविषयी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर लोकांनी संमिश्र स्वरुपाची मतंही नोंदवली आहेत. तर पाहुयात विविध आघाड्यांवरील सरकारची कामगिरी.

१) गेल्या सात वर्षातील मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी पाहता २०२४ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल का?

या प्रश्नासाठी होय, नाही आणि तटस्थ असे तीन पर्याय देण्यात आले होते. यामध्ये ६२.१ टक्के लोकांनी २०२४ मध्ये मोदी सरकारच पुन्हा सत्तेत येईल असा कौल दिला. तर ३३.८ टक्के लोकांनी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही असा कौल दिला. सुमारे ४.१ टक्के लोकांनी तटस्थ राहणार असल्याचं म्हटलं आहे.

२) पहिल्या कार्यकाळाच्या तुलनेत गेल्या दोन वर्षातील सरकारचं कामकाज कसं आहे?

या प्रश्नावर मात्र, मोदी सरकार काठावर पास झालं आहे. यामध्ये ५१.२ टक्के लोकांनी मोदी सरकारचं पहिल्या कार्यकाळापेक्षा दुसऱ्या कार्यकाळातील कामकाज चांगलं असल्याचं म्हटलंय. तर ३८.९ टक्के लोकांनी सरकारचं कामकाज वाईट असल्याचं म्हटलं आहे. तर ९.९ टक्के लोकांनी चांगल्या किंवा वाईट या दोन्हींपैकी कुठल्याही बाजूने मत दिलेलं नाही. या प्रश्नाला एकूण ८०७४ लोकांनी प्रतिसाद दिला.

३) मोदी सरकारच्या कारभाराला किती गुण द्याल?

या प्रश्नाला ८१०३ लोकांनी प्रतिसाद दिला. याच्या उत्तरासाठी लोकांना शून, पाच पेक्षा कमी, पाच पेक्षा जास्त आणि दहा असे पर्याय देण्यात आले होते. यापैकी सर्वाधिक ४०.३ टक्के लोकांनी दहा गुणांचा पर्याय निवडला. त्याखालोखाल २२.३ टक्के लोकांनी पाच पेक्षा जास्त गुणांचा पर्याय निवडला आहे. तर मोदी सरकारला पाच पेक्षा कमी गुण १९.३ टक्के लोकांनी दिले आहेत. तसेच १८.१ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कारभाराला शून्य गुण दिलेत.

हेही वाचा: 7 Yrs of Modi Govt: मोदी सरकारच्या 'या' पाच निर्णयांवरुन वाद का झाले?

४) कोणत्या क्षेत्रात मोदी सरकारची कामगिरी चांगली आहे असं वाटतं?

यावर मतं नोंदवताना लोकांनी संरक्षण क्षेत्रासाठी चांगलं काम केल्याचं म्हटलं आहे. यासाठी ५७.९ टक्के लोकांनी कौल दिला आहे. त्यानंतर ३२.८ टक्के लोकांनी पायाभूत सुविधांमध्ये सरकारचं काम चांगलं असल्याचं म्हटलंय. त्यानंतर रेल्वे विभागात सरकारचं चांगलं काम असल्याचं लोकांनी म्हटलंय तर सर्वात कमी लोकांनी महिला सबलीकरणात सरकारनं काम केल्याचं मत नोंदवलंय. यामध्ये ७,०७५ लोकांनी मतदान केलं.

५) सरकारचं 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेप्रमाणं काम होतंय का?

यावर ५४.७ टक्के लोकांनी 'होय' असं उत्तर दिलंय. तर ४१.६ टक्के लोकांनी 'नाही' हा पर्याय निवडला. १३.१ टक्के लोकांनी तटस्थ राहणं पसंद केलंय. या प्रश्नाला ८०७८ लोकांनी प्रतिसाद दिला.

६) मोदी सरकारनं कोरोनाची परिस्थिती कशी हाताळली?

या प्रश्नाला ८,०९१ लोकांनी प्रतिसाद दिला. यांपैकी ३८.४ टक्के लोकांनी कोरोना काळात मोदी सरकारची कामगिरी वाईट असल्याचं म्हटलंय. ८.८ टक्के लोक तटस्थ राहिले आहेत. तर सर्वाधिक ५२.९ टक्के लोकांनी सरकारनं कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हातळली असं मत नोंदवलंय.

हेही वाचा: आव्हानांपासून ‘साध्य’पर्यंतचा प्रवास

७) पंतप्रधान मोदींकडून बिगर भाजपशासित राज्यांसोबत दुजाभाव केला जातोय का?

या प्रश्नावर लोकांनी नोंदवलेली मतं सरकारला विचार करायला भाग पाडू शकतात. कारण ५४.७ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलंय. पण ४१.४ टक्के लोकांनी सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचं म्हटलंय. तर उर्वरित ३.९ टक्के लोकांनी तटस्थ राहणं पसंद केलं. या प्रश्नाला ८,०९४ लोकांनी प्रतिसाद दिला.

८) आर्थिक क्षेत्रात मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक आहे का?

या प्रश्नाला ८,०८३ लोकांनी प्रतिसाद दिला. यामध्ये ५१.७ टक्के लोकांनी सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचं मत नोंदवून यामध्ये सरकारला काठावर पास केलंय. तर ४१.९ टक्के लोकांनी आर्थिक क्षेत्रात मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक नसल्याचं म्हटलंय. यांपैकी ६.४ टक्के लोकांनी आपल्याला कोणतंही मत नोंदवायचं नाही असा तटस्थ पर्याय निवडला.

९) मोदी सरकारकडून कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी होणं अपेक्षित आहे?

या प्रश्नाला ७,८६७ लोकांनी प्रतिसाद दिला. पण लोकांनी संमिश्र मतं नोंदवली आहेत, जी सरकारला आरसा दाखवणारी ठरू शकतात. कारण यामध्ये सर्वाधिक ३३ टक्के लोकांनी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने चांगली कामगिरी करणं अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. तर त्यानंतर ३०.५ टक्के लोकांनी रोजगाराच्या क्षेत्रात सरकारची चांगली कामगिरी होणं अपेक्षित असल्याचं म्हटलंय. १८.४ टक्के लोकांनी कृषी क्षेत्रात सरकारला कामगिरी उंचवावी लागेल असं म्हटलंय. तर १८.१ टक्के लोकांनी शिक्षण क्षेत्रात सरकारनं चांगली कामगिरी करणं अपेक्षित असल्याचं मत नोंदवलंय.

हेही वाचा: मोदी सरकारने सात वर्षात घेतलेले निर्णय, उत्पन्न आणि गुंतवणूक

१०) सरकारनं सर्वच क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या असं वाटतं का?

या प्रश्नावर ८०८६ लोकांपैकी निम्म्या लोकांनी म्हणजे ४,०४३ म्हणजेच ५० टक्के लोकांनी देशात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाहीत अस मत नोंदवलंय. त्यानंतर ३९.६ टक्के लोकांना सरकारनं रोजगाराच्या संधी निर्माण केल्याचं वाटतंय. तर १०.५ टक्के लोकांनी या प्रश्नावर तटस्थ राहणं पसंद केलंय.

११) शेतकऱ्याचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचं मोदी सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण होईल असं वाटतं का?

या प्रश्नावर सरकार फेलं ठरलं आहे. कारण सर्वाधिक ४९.७ टक्के लोकांनी सरकारचं आश्वासनं पूर्ण होणार नाही असं म्हटलंय. त्यानंतर ४०.४ टक्के लोकांनी शेतकऱ्यांच उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट होईल असं वाटतंय. तर ९.९ टक्के लोकांना दोन्ही गोष्टींबाबत साशंक आहेत, म्हणून त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. या प्रश्नाला ८०८२ लोकांनी प्रतिसाद दिला.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या जागतिक प्रतिमेला 'कोविड'मुळे तडा?

१२) मोदींच्या मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्याची कामगिरी चांगली आहे?

या प्रश्नासाठी गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पर्याय देण्यात आले होते. यांपैकी लोकांनी नितीन गडकरी यांच्याबाजूनं भरभरुन मतं दिली आहेत. तब्बल ८० टक्के लोकांनी गडकरींच्या कामगिरीला पसंती दिली आहे. १७.२ टक्के लोकांनी अमित शहा यांच्या कामगिरीला मत दिलंय. त्यानंतर निर्मला सितारामण यांचा क्रमांक लागतो तर सर्वात खराब कामगिरी डॉ. हर्षवर्धन यांनी केलीय असं मत लोकांनी नोंदवलंय. या प्रश्नाला ७,९२७ लोकांनी प्रतिसाद दिला.

१३) केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरणं समाधानकारक आहे का?

या प्रश्नाला ८०८० लोकांनी प्रतिसाद दिला. यांपैकी ६६.२ टक्के लोकांनी मोदी सरकारचं परराष्ट्र धोरणं समाधानकारक असल्याचं मत नोंदवलंय. त्यानंतर २८.८ टक्के लोकांनी सरकारचं परराष्ट्र धोरणं चांगलं नसल्याचं मत नोंदवलंय. तर उर्वरित ५ टक्के लोकांनी तटस्थ राहणं पसंद केलंय.

Web Title: Esakal Survey 7 Years Of Modi Government In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiIndia
go to top