भारतातील भाज्यांसाठी युरोपची दारे खुली

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

युरोपीय समुदायाकडून भारतातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यांनतर ब्रुसेल्स येथे गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीत भारतातील आंब्याच्या निर्यातीवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोची - युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर तीन वर्षांसाठी घातलेली बंदी उठविली आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी येथे दिली. युरोपीय समुदायाने आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूच्या आयातीवर बंदी घातली होती. यामुळे भारतीय भाज्यांसाठी युरोपची कवाडे पुन्हा खुली झाली आहेत.

कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहतूक विभागाच्या वतीने आयोजित परिसंवादाला कृषी मंत्रालयातील निर्यात-आयात विभागाचे सहायक संचालक आर. एस. अरोरा उपस्थित होते. या परिसंवादात अरोरा यांनी युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या भाज्यांवरील बंदी उठविली असून, याबबतचे पत्र कृषी मंत्रालयाला मिळाल्याचे सांगितले, अशी ही माहिती कोची विमानतळाने दिली आहे.
युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर मे 2014 मध्ये तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. यात आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूचा समावेश होता. या भाज्यांमधील काही हानीकारक घटक संपूर्ण युरोपच्या जैवसुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचे युरोपीय समुदायाने म्हटले होते. या निर्णयामुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला होता.

केंद्र सरकारने युरोपीय समुदायाने भाज्यांच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठविण्यासाठी सर्व राजनैतिक पावले उचलण्यात येतील, असे म्हटले होते. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी युरोपीय समुदायाच्या अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, युरोपमधील ब्रिटनसह अनेक देशांशी त्यांनी चर्चा केली होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय
युरोपीय समुदायाकडून भारतातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यांनतर ब्रुसेल्स येथे गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीत भारतातील आंब्याच्या निर्यातीवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: European Union Lifts 3-Year Ban On Import Of Vegetables From India