समान नागरी कायद्याला ईशान्य भारतातही विरोध

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

समान नागरी कायद्याच्या मुद्यावर मतांचे धुव्रीकरण करण्यासाठी भाजप मुस्लिमांना शत्रूप्रमाणे वागवत आहे, असा आरोप करीत "हिंदू अविभक्त कुटुंबाला मिळणारे फायदे ख्रिस्ती व मुस्लिमांना का मिळत नाहीत,' असा सवाल ओवेसी यांनी केला

हैदराबाद - समान नागरी कायदा हा केवळ मुस्लिमांशी संबंधित नसून ईशान्य भारतातूनही विशेषतः नागालॅंड व मिझोराममधून त्याला विरोध होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मजलिस ए- इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी केले. या कायद्याने देशातील बहुआयामित्व व विविधता; तसेच अनेक गोष्टी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याची टीका ओवेसी यांनी केली.

समान नागरी कायद्याच्या मुद्यावर मतांचे धुव्रीकरण करण्यासाठी भाजप मुस्लिमांना शत्रूप्रमाणे वागवत आहे, असा आरोप करीत "हिंदू अविभक्त कुटुंबाला मिळणारे फायदे ख्रिस्ती व मुस्लिमांना का मिळत नाहीत,' असा सवाल ओवेसी यांनी केला. देशात धार्मिक कायदे असू नयेत, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू व्यक्त करतात; मग हिंदू अविभाज्य कुटुंब, हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसाहक्क कायदा हे सर्व काय आहेत, असेही त्यांनी विचारले.

समान नागरी कायद्यासंदर्भात विचार व योजना स्पष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करणार असल्याचे विधी व कायदा आयोगाने कळविले आहे. या विषयावरील एक प्रश्‍नावलीही पक्षांना पाठविण्यात आली आहे. पक्षांनी या विषयावरील आपले विचार 21 नोव्हेंबरपर्यंत कळविण्याची सूचनाही केली आहे. हा कायदा मागील दरवाजाने नाही, तर सर्वांच्या सहमतीनेच मंजूर करण्यात येणार असल्याचे नागरी विकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Even north-east opposes UCC,says Owaisi