माजी खासदारांना बंगले सोडवेनात

पीटीआय
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही माजी खासदारांचा दिल्लीतील ल्यूटन्स झोनमधील बंगल्यांचा मोह काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील लोकसभा विसर्जित होऊन पाच महिने झाले, तरीसुद्धा ५० माजी खासदारांनी अद्याप त्यांचे सरकारी बंगले रिकामेच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही माजी खासदारांचा दिल्लीतील ल्यूटन्स झोनमधील बंगल्यांचा मोह काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील लोकसभा विसर्जित होऊन पाच महिने झाले, तरीसुद्धा ५० माजी खासदारांनी अद्याप त्यांचे सरकारी बंगले रिकामेच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व खासदारांना गोडीगुलाबीने बंगल्यांच्या बाहेर काढण्यासाठी आता कायदेशीर कारवाईचा आधार घेतला जाणार आहे. नव्या कायद्यान्वये सरकार आता वेळीच घर खाली न करणाऱ्या नेत्याला कारणे दाखवा नोटीस बजावू शकते. यावर संबंधित व्यक्तीला केवळ तीनच दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार असून, पूर्वीच्या कायद्यानुसार ही मर्यादा पंधरा दिवस एवढीच होती.

या सर्व नेत्यांना त्यांचे बंगले रिकामे करण्यासाठी पूर्वसूचना देण्यात आली असून, त्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. नियमानुसार लोकसभा विसर्जित झाल्यानंतर या सर्व माजी खासदारांनी एका महिन्यामध्येच हे सरकारी बंगले रिकामे करणे अपेक्षित होते. पण, त्यांनी मात्र तेथेच मुक्काम केल्याचे निदर्शनास आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex mp bunglow release