फेसबुक-दिल्ली सरकार आमनेसामने | Facebook | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेसबुक-दिल्ली सरकार आमनेसामने
फेसबुक-दिल्ली सरकार आमनेसामने

फेसबुक-दिल्ली सरकार आमनेसामने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - दिल्लीत गेल्या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या दंगलीप्रकरणी फेसबुक इंडिया आणि दिल्ली सरकार आमनेसामने आले. चौकशी समितीसमोरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण झाले.

द्वेषमूलक मजकूरामुळे आम्हाला यातना होतात असे फेसबुकच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर, आम्हाला तरी खात्री वाटत नाही, असे दिल्ली सरकारच्या प्रतिनिधीने सांगितले. फेसबुकचे प्रतिनिधित्व सार्वजनिक धोरण संचालक शिवनाथ ठुकराल यांनी केले. सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) राघव चढ्ढा यांनी त्यांना अनेक मुद्द्यांवरून धारेवर धरले.

भारतात काम करणाऱ्या कर्मचारी आणि संचालक मंडळाची धार्मिक बांधिलकी तसेच द्वेषमूलक पोस्टबाबतचे धोरण या मुद्द्यांवरून फेसबुकला चढ्ढा यांनी काही अवघड प्रश्न विचारले. याबाबतचा तपशील सादर करावा असे फेसबुकला सांगण्यात आले. त्यावर भारतातील कायदे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हे करता येणार नाही असे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले.

चढ्ढा हे दिल्ली विधानसभेच्या शांतता-सलोखा समितीचे प्रमुख आहेत. भारतात काम करणाऱ्या लोकांच्या धार्मिक बांधिलकीबाबत त्यांनी विचारले असता ठुकराल यांनी स्पष्ट केले की, भारतात तीनशे, तर धोरणविषयक विभागात सुमारे २० जण काम करतात. धार्मिक अल्पसंख्य कर्मचाऱ्यांच्या संख्येचा तपशील आम्ही ठेवत नाही, कारण भारतातील कायद्यानुसार तशी परवानगी नाही.

त्यावर चढ्ढा यांनी पुढील सुनावणीच्या फेसबुकने संचालकांबाबत त्यांचा धर्म आणि त्यांच्याकडील समभाग तसेच सार्वजनिक धोरण विभागाचे स्वरूप हे तपशील देण्यास सांगितले. प्रश्नांना बगल देऊन तुम्ही कामकाज पाहणाऱ्या समितीला हताश करीत आहात असेही चढ्ढा यांनी सुनावले. दंगलीपूर्वी एक महिना आधी आलेल्या तक्रारी आणि त्यानंतर दोन महिन्यांत आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेली कारवाई हा तपशील देण्यासही समितीने सांगितले.

हेही वाचा: म्हशींच्या 'फॅमिली प्लॅनिंग'साठी 24 कोटींचा रेडा; खातो काजू-बदाम

भारतीय संदर्भात द्वेषमूलक भाषणाची व्याख्या केली का, प्रश्नावर जातीचा मुद्दा यात समाविष्ट केल्याचे फेसबूककडून सांगण्यात आले.

द्वेषामुळे आम्हाला वेदना होतात. आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून द्वेष पसरावा असे आम्हाला वाटत नाही. आमच्या जाहिरातदारांनाही द्वेष नको आहे. आम्ही त्यादृष्टिने सतत काम करीत आहोत.

- शिवनाथ ठुकराल, फेसबुकचे संचालक

तुम्हाला द्वेषामुळे वेदना होतात का याची मला खात्री नाही, याचे कारण तुम्ही एक व्यापार म्हणून कंपनी चालविता. द्वेषमूलक पोस्ट व्हायरल झाल्यामुळे तुम्हाला महसूल मिळतो.

- राघव चढ्ढा, आपचे नेते

फेसबुकचे मुद्दे

  • आणीबाणीत उपयुक्तता - कोरोनाचा कहर माजला असताना ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली. त्यावेळी ऑक्सिजन मिळावा म्हणून त्याचीच गरज आहे हे सांगण्यासाठी अनेकांकडून फेसबुकचा वापर.

  • गुंतवणूक - या एकाच वर्षात सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक. या विषयाची फेसबुकला जाणीव आणि गांभीर्य.

  • पोस्टविरुद्धच्या तक्रारी - तक्रार आल्यानंतर २४ तासांत पोचपावती दिली जाते. मजकूरामुळे धोरणाचा भंग होत असल्यास पोस्ट तातडीने काढून टाकली जाते.

loading image
go to top