माध्यमातील चुकीच्या बातम्यांमुळे गरिबी हटणार नाही; RBIच्या रिपोर्टवरुन राहुल गांधींचे टीकास्त्र

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) वार्षिक रिपोर्टवरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) वार्षिक रिपोर्टवरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. माध्यमांच्या साह्याने लक्ष हटवल्याने गरिबांची मदत होणार नाही. मी मागील काही महिन्यांपासून सरकारला आर्थिक मुद्द्यावरुन सतर्क करत होतो, आता भारतीय रिझर्व्ह बँकेनेच माझ्या चेतावणीची खातरजमा केली आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यांनी या संदर्भात बुधवारी ट्विट केलं आहे. 

रशियाच्या व्हॅक्सिनसाठी भारताची तयारी? वाचा आरोग्य मंत्रालय काय म्हणते 

रिझर्व्ह बँकेने मंगळवारी एक आर्थिक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत. आर्थिक खर्च कमी करा, अधिक उधार देऊ नका, गरीबांना पैसा द्या, उद्योगपतींच्या करामध्ये कपात करु नको, असं राहुल म्हणाले आहेत.  मीडियाच्या मदतीने लक्ष हटवून गरिबांना मदत मिळणार नाही, तसे  यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट दूर होणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. 

मंगळवारी रिझर्व्ह बँकेने संप्टेंबर महिन्यापर्यंत आर्थिक आंकुचनाची चेतावणी दिली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढणे, मान्सून आणि जागतिक बाजारात निर्माण झालेले चढ उतार आर्थिक विकासामधील धोके असल्याचं आरबीआयने सांगितले आहे. आरबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रकोप सुरु आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात देशात दोन हजारांच्या नोटा छापल्या गेल्या नाहीत. याकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी (unemployment) आली आहे. रोजगार निर्मिती कमी झाली आहे. कोरोनाकाळात संथ गुंतवणूकीमुळे कोविड काळात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

भारतात कोरोना का वाढतोय? ICMR ने सांगितलं कारण

आरबीआयचा 2019-20 चा वार्षिक अहवाल वाढती गुंतवणूक आणि सुधारणांवर केंद्रित आहे. अहवालात आरबीआयने म्हटले आहे की, दुस-या तिमाहीतही आर्थिक व्यवहारांमध्ये कोरोनाचा परिणाम दिसून येईल. कोरोनामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळीत असमतोल निर्माण झाला आहे. आरबीआयने गुंतवणूकीसाठी सुधारणांची शिफारस केली आहे.  या अहवालात आरबीआयने 2040 पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 4 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे सांगितली आहे.

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी अक्षमतेचे राजकूमार असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय ते पीएम केअर फंडवरुन फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: False news in the media will not eradicate poverty Rahul Gandhi's Tikastra from RBI report