कुटुंबाला "आधार', पण गाव निराधारच! 

कुटुंबाला "आधार', पण गाव निराधारच! 

शहादा : पहिल्या तीन-चार वर्षांत तर नाही, पण नंतरच्या सहा वर्षांत बॅंक खात्यासह मुलांचे शिक्षण आणि पतीच्या आजारपणात या कार्डाचा मोठा "आधार' झाला. आधारकार्ड देण्यासाठी थेट पंतप्रधान आमच्या गावात आले. त्यानिमित्ताने गाव चकाचक झाले. वीजही आली. आता गावचा विकास होईल, असे त्या वेळी वाटले होते. कार्डाचा व्यक्तिश: उपयोग झाला, मात्र आमच्या गावची स्थिती काही सुधारली नाही! आधारकार्डाची पहिल्या मानकरी ठरलेल्या शहादा तालुक्‍यातील टेंभली गावातील महिलेचा हा अनुभव. 

तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नंदन नीलेकणी यांच्या उपस्थितीत 29 सप्टेंबर 2009 रोजी आधार योजनेला प्रारंभ झाला. टेंभली (ता. शहादा, जि. नंदुरबार) या शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेल्या गावाला योजनेच्या शुभारंभाचा मान मिळाला. त्यास दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशातील पहिल्या आधारकार्डधारक रंजना सोनवणे यांनी "सकाळ'कडे आपले अनुभव मांडले. 
देशात सर्वप्रथम मला आधारकार्ड मिळाले, या घटनेचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र, त्याचा नेमका उपयोग काय, याची माहिती कोणीच दिली नाही.

कार्ड हरवू नये, या भीतीने घरातील एकमेव पेटीत ते कुलूपबंद करून ठेवले. कार्ड वितरणाच्या वेळी गावात वीज आली, गाव चकाचकही झाले. मात्र, आजही या योजनेच्या प्रारंभापूर्वी जी परिस्थिती होती तशीच आहे. वीजबिल भरले नसल्याने कंपनीने आमच्या झोपड्यांवरील मीटर काढून नेले. पाणीपुरवठा सुरळीत नाही. काही ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती भयावह झाली आहे, असे त्या म्हणाल्या. 

पहिला उपयोग 

"आधार'चा सर्व प्रथम वापर हा बॅंकेत खाते उघडण्यासाठी केला. त्यानंतर मुले शाळेत जायला लागली, गुरुजींनी त्यांच्याकडून आधारकार्डची मागणी केल्यानंतर "आधार'चे महत्त्व कळाले. दोन वर्षांपूर्वी पती सदाशिव सोनवणे यांच्या आजारपणातील उपचारासाठी महात्मा फुले योजनेंतर्गत पात्रतेचा दाखला मिळविण्यासाठी "आधार'ची गरज भासली, असे रंजना म्हणाल्या. 

शासकीय योजनेचा लाभ 

लोणखेडा (ता. शहादा) येथील बॅंक ऑफ इंडियात खाते आहे. या बॅंकेने आम्हाला पी. ओ. एस. मशिनसारख्या मोबाईल एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली असून, दरमहा शासकीय योजनांचा जमा होणारा निधी मिळावा, याकरिता महिन्यातून एकदा बॅंकेचे अधिकारी हे मशिन गावात आणतात. आमचे आधारकार्ड पाहिल्यानंतर आमच्या बोटांचे ठसे घेत त्या-त्या खातेधारकाला रक्कम अदा करतात. कुटुंबासाठी हे कार्ड "आधार' ठरले, पण गाव अजूनही निराधार आहे, असे रंजना सोनवणे सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com