25 शताब्दी एक्सप्रेसच्या भाड्यात होणार कपात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

भारतीय रेल्वे 25 शताब्दी एक्सप्रेसचे भाडे कमी करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. देशातील जवळपास 25 शताब्दी एक्सप्रेसच्या भाड्यात लवकरच कपात करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काही निवडक मार्गांवर ही भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्या मार्गांवर शताब्दी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची संख्या कमी असते अशा मार्गांवर भाडे कमी करण्याचा सरकार विचार करीत आहे. 

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे 25 शताब्दी एक्सप्रेसचे भाडे कमी करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर दोन गाड्यांचे भाडे यशस्वीरीत्या कमी करण्यात आले होते हे प्रमुख कारण भाडे कमी करण्याच्या प्रस्तावाला गती मिळण्यामागे आहे.

रेल्वेच्या देशभरात 45 शताब्दी गाड्या सुरु आहेत. देशातील सर्वात जलद ट्रेन म्हणून शताब्दी एक्सप्रेस ओळखली जाते. रेल्वेने गेल्या वर्षी दोन शताब्दी गाड्यांवर पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत काम केले होते. प्रवाशांची संख्या कमी असलेल्या नवी दिल्ली ते अजमेर आणि चेन्नई ते म्हैसूर शताब्दी गाड्यांचे भाडे कमी करुन त्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. या योजनेनुसार जयपूर ते अजमेर आणि बंगळुरू ते म्हैसूर दरम्यान भाडे कमी करण्यात आले होते. भाडे कमी केल्यामुळे तेथे कमाईमध्ये 17 टक्के वाढ आणि प्रवासी संख्येत 63 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Web Title: Fares for 25 shatabdi express trains likely to come down soon