छत्तीसगडमध्येही काँग्रेसकडून कर्जमाफी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

भूपेश बघेल यांच्या हाती सूत्रे सोपवल्याने या राज्यातील काँग्रेसमध्ये उत्साह पसरला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले भूपेश बघेल हे राजकारणातील आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. 90 जागा असलेल्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसने 68 जागांवर विजय मिळवला आहे.

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषिकर्ज माफ करण्याची घोषणा केली. 

बघेल म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात दिले होते. छत्तीसगडमध्ये सुमारे १६.६५ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. ही कर्जमाफी एकूण ६,१०० कोटी रुपयांची असेल.’’

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी भूपेश बघेल यांचा सोमवारी शपथविधी झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी बघेल यांना पद आणि गुप्ततेची शपथ दिली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील नेते टी. एस. सिंह देव आणि ताम्रध्वज साहू यांचाही या वेळी मंत्री म्हणून शपथविधी झाला. बलबीर जुनेजा इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम झाला. राहुल गांधी, डॉ. मनमोहनसिंग, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, नवज्योतसिंग सिद्धू, फारुख अब्दुल्ला तसेच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह या वेळी उपस्थित होते. 

भूपेश बघेल यांच्या हाती सूत्रे सोपवल्याने या राज्यातील काँग्रेसमध्ये उत्साह पसरला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले भूपेश बघेल हे राजकारणातील आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. 90 जागा असलेल्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसने 68 जागांवर विजय मिळवला आहे.

Web Title: Farm Loan Waiver Announced In Chhattisgarh