लाच देण्यासाठी शेतकरी कुटुंब मागतेय भीक

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या शेतकऱ्याला आता आपली स्वतःचीच जमीन परत मिळविण्यासाठी लाच द्यायची आहे आणि त्यासाठी त्याला चक्क रस्त्यावर कुटुंबासह भीक मागण्याची वेळ आली आहे. होय हे सत्य आहे आणि हे घडलंय आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात.

हैदराबाद : हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या शेतकऱ्याला आता आपली स्वतःचीच जमीन परत मिळविण्यासाठी लाच द्यायची आहे आणि त्यासाठी त्याला चक्क रस्त्यावर कुटुंबासह भीक मागण्याची वेळ आली आहे. होय हे सत्य आहे आणि हे घडलंय आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात.

कर्नुल जिल्ह्यातील मोठकूर गावातील शेतकरी पत्नी व दोन मुलांसह मार्केटमध्ये भीक मागत आहे. त्यांना भीक म्हणून अन्न नव्हे तर पैसे हवे आहेत. त्यांना हे पैसे अधिकाऱ्याला द्यायचे आहे ते पण लाच म्हणून. तरंच त्यांना त्यांचे शेत परत मिळू शकणार आहे. मण्यम व्यंकटेशवरालू उर्फ राजू या शेतकऱ्याची ही करुण कहाणी आहे.

राजूने दिलेल्या माहितीनुसार, स्वतःच्या मालकिच्या शेतीची कागदपत्रे मिळविण्यासाठी महसूल अधिकारी लाच मागत आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालयाचाही हात आहे. भीक मागताना आम्हाला पैसे मागावे लागत आहे, कारण आम्हाला त्या अधिकाऱ्याला लाच द्यायची आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या छोट्याशा शेतासाठी झगडतोय. या कुटुंबाने भीक मागण्याच्या ठिकाणी बॅनर लावले असून, या बॅनर तेलगूमध्ये आम्ही जमीन मिळविण्यासाठी भीक मागत असल्याचे म्हटले आहे. राजू यांची दोन लहान मुले सुची आणि सुजित ही बॅनर घेऊन फिरतात. 

कर्नुल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. सत्यनारायण यांनी राजूचे हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. राजूवर खात्याची बदनामी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राजूने त्यांच्या जमिनीचा कौटुंबिक वाद न्यायालयात सोडवावा, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Farmer Begging To Collect Bribe To Get Land Back