Video: शेतकरी नेते राकेश टिकेत रडले; आत्महत्या करण्याची दिली धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 29 January 2021

26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे.

नवी दिल्ली- 26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात केंद्र सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकरी नेत्यांवर दबाव वाढला आहे. असे असले तरी भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकेत यांनी आंदोलन मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माध्यमाशी बोलताना त्यांना रडू कोसळल्याचा एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. 

राकेश टिकेत यांनी कृषी कायदे मागे घेण्याची आपली मागणी कायम ठेवली आहे. तसेच कृषी कायदे रद्द केले नाही तर फाशी घेऊ, आत्महत्या करु असं ते म्हणाले आहेत. आम्ही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत राहणार असून जोपर्यंत आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्यांविरोधात काही कारवाई केली जाणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी मागे हटू नये असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. 

आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. जोपर्यंत केंद्र सरकारसोबतची चर्चा पार पडत नाही, तोपर्यंत आम्ही जागा रिकामी करणार नाही. प्रशासनाने आम्हाला त्रास देण्यासाठी पाणी आणि वीज सुविधा काढून घेतल्या आहेत. आम्ही आमच्या गावातून पाणी आणू, पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं राकेश टिकेत म्हणाले आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलन सुरुच राहणार आहे हे स्पष्ट होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer protest BKU leader Rakesh Tikait breaks down while speaking to media