Tractor Parade: दिल्ली पोलिसांची 'गांधीगिरी', शेतकऱ्यांनी ऐकलं नाही म्हणून अधिकारीच बसले रस्त्यावर

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 26 January 2021

संतप्त शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे अश्रूधुराचा वापर केला तर गाझीपूर येथे लाठीचार्जही केला. 

नवी दिल्ली- कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला परवानगी दिली होती. परंतु, आंदोलक शेतकऱ्यांनी निश्चित वेळेच्या आणि ठरलेल्या मार्गांपेक्षा इतर ठिकाणांहून परेड नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. दिल्लीतील नागलोई येथे पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी एकत्र रस्त्यावरच बैठक मारली. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी सर्व जागांवर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून दिल्लीतील सीमेत निश्चित वेळेच्या आधीच जाण्यास प्रारंभ केला. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले आणि दिल्लीत दाखल झाले. अशीच परिस्थिती गुरुग्राम, फरिदाबादमध्येही दिसली. संतप्त शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे अश्रूधुराचा वापर केला तर गाझीपूर येथे लाठीचार्जही केला. 

हेही वाचा- VIDEO : स्टंट करताना उलटला ट्रॅक्टर; दिल्ली सीमेवर गोंधळाची परिस्थती

यापूर्वी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर स्वच्छ करुन त्यावर तिरंगा आणि बॅनर लावले. प्रजासत्ताक दिन आणि शेतकऱ्यांची प्रस्तावित ट्रॅक्टर परेडच्या पार्श्वभूमीवर राजपथ आणि राजधानी दिल्लीच्या अनेक सीमांवर हजारो सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांची ट्रॅक्टर परेड मध्य दिल्लीत प्रवेश करणार नाही तसेच प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर ट्रॅक्टर परेड काढणार असल्याचे म्हटले होते. 
हेही वाचा- Tractor Parade:संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer protest Delhi Police officers sit on road where farmers holding tractor parade have reached