Farmer Protest:खासदार शेतकऱ्यांच्या भेटीविनाच परतले; पोलिसांनी परवानगी नाकारली

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 4 February 2021

शेतकरी आंदोलावरुन राजकीय वातावरण तापलं आहे

नवी दिल्ली- आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला गेलेल्या विरोध पक्षाच्या खासदारांना भेटीविनाच परतावं लागलं आहे. पोलिसांनी भेटीची परवानगी नाकारली आहे. सरकारची ही मनमानी असून आंदोलक शेतकऱ्यांना भेटू न देणं चुकीचं असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. पाकिस्तान-चीन बॉर्डरवर जशी परिस्थिती नसते, तशी परिस्थिती दिल्ली सीमेवर दिसत असल्याची प्रतिक्रिया अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी दिली आहे.

शेतकरी आंदोलावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. गाझीपूर बॉर्डर शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनले आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी ठाण मांडून आहेत. केंद्र सरकारने या शेतकऱ्यांचा पाणीपुरवठा-इलेक्ट्रिसिटी तोडली आहे. तसेच गाझीपूर बॉर्डरवर बॅरिकेड्स उभारले आहेत. गाड्यांच्या वहनाला पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला अचडणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध पक्षाचे १० खासदार दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. पण, त्यांना पोलिसांनी रोखलं आहे. त्यामुळे खासदार आक्रमक झाले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करायला आलो होता. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यांना आंदोलनास्थळी आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीयेत. आम्हाला त्यांच्याशी भेटू द्यावे, अन्यथा आम्ही परत जाऊन सभापतींना याबाबत कळवू. सभापती कोणत्या एका पक्षाचे नसतात. त्यांनी यात योग्य भूमिका घेण गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

आम्ही शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलो होतो. जेणेकरुन संसदेत हा मुद्दा मांडता येईल. सभापती आम्हाला हा मुद्दा उपस्थित करु देत नाहीयेत. इथे नेमकं काय सुरु आहे, याची माहिती आम्ही देऊ. शेतकऱ्यांना येथे आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीयेत. पाणीपुरवठा, इलेक्ट्रिसिटी सर्व काही खंडीत करण्यात आले आहे, असं अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल म्हणाल्या आहेत. शेतकऱ्यांशी भेटून त्यांच्याशी चर्चा करायला आलेल्या खासदारांना दिल्ली पोलिसांना रोखण्यात आल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer protest farm law rashtrawadi congress supriya sule