Tractor Parade: दंगेखोरांकडून लाल किल्ल्याची प्रचंड नासधूस, पाहा फोटो

सकाळ ऑनलाइन टीम
Wednesday, 27 January 2021

ज्या लाल किल्ल्यावर संपूर्ण देशवासियांना अभिमान आहे. ज्या लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्या ऐतिहासिक इमारतीची अशी दुरावस्था होईल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता.

नवी दिल्ली- ज्या लाल किल्ल्यावर संपूर्ण देशवासियांना अभिमान आहे. ज्या लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्या ऐतिहासिक इमारतीची अशी दुरावस्था होईल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी दंगेखोऱ्यांनी जो हिंसाचार केला, त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी घटनास्थळावर आंदोलकांनी केवळ निशाण साहिब यांचा ध्वज लावला नाहीतर तेथे मोठ्याप्रमाणात तोडफोडही केली. लाल किल्ल्याच्या भिंतीपासून ते वाहने आणि खुर्च्यापण या दंगेखोरांनी सोडल्या नाहीत. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

'एएनआय'ने लाल किल्ल्याची काय स्थिती झाली आहे, हे फोटोच्या साहाय्याने दाखवले आहे. सिंघु आणि टिकरी सीमेवरुन आलेल्या आंदोलकांनी मंगळवारी दुपारी लाल किल्ल्यावर हल्लाबोल केला. दंगेखोरांनी तिकीट काऊंटर, प्रवेशद्वाराची तोडफोड केली आणि तिथे ठेवण्यात आलेले मेटल डिटेक्टर मशीनचेही मोठे नुकसान केले. 

हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलनकर्त्यांनी लाल किल्ल्यावर काही वेळासाठी कब्जा केला होता. आंदोलनकर्त्यांनी घुमटावर चढून तिथे निशाण साहिब यांचा झेंडा फडकवला. त्यानंतर त्यांनी समोर जे दिसेल त्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामध्ये काही घुमटांचेही नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भयावह फोटोंवरुन घटनेची दाहकता दिसून येते. तुटलेले तिकीट काऊंटर, पसरलेल्या काचा आणि कागदपत्रांचे तुकडे पसरलेले होते. लाल किल्ल्यात हा गोंधळ दीर्घ काळ सुरु होता. पोलिसांना मोठ्या महत्प्रयासाने आंदोलकांना हटवण्यात यश आले. 

हेही वाचा- मुलीची काळजी असणाऱ्या कुटुंबात तुझा पुनर्जन्म व्हावा, गौतम यांचा आमटे कुटुंबीयांवर अप्रत्यक्ष निशाणा; लिहिली भावूक पोस्ट

दरम्यान, लाल किल्ल्यावर झालेल्या या तोडफोडीनंतर केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल घटनास्थळी दाखल झाले. लाल किल्ल्यावरील बंदोबस्त आता वाढवण्यात आला आहे. नेहमीपेक्षा जास्त जवान तिथे तैनात करण्यात आले आहेत. 
 

हेही वाचा- ट्रॅक्टर परेडमध्ये काठी आणा सांगणारा व्हिडीओ व्हायरल; शेतकरी नेत्यानं दिलं स्पष्टीकरण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Protest Latest Visuals of vandalized Red Fort Video Photos